Nitish Kumar Resignation Rumors: बिहारच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देऊन केंद्रात म्हणजेच राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, नितीश कुमार राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात आणि यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मोठ्या बदलामुळे बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद?
या राजकीय फेरबदलात सर्वात मोठी चर्चा नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांची आहे. राजकीय वर्तुळातून मिळणाऱ्या माहितीनुसार, निशांत कुमार हे बिहारचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. आजवर राजकारणापासून दूर राहिलेल्या निशांत यांच्या प्रवेशामुळे जनता दल युनायटेड (JDU) मध्ये नवी पिढी सत्तेत येईल, असे मानले जात आहे.
नितीश कुमार यांच्या अत्यंत जवळच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिल्लीत सर्व काही ठरले असून, आता बदलाची वेळ आली आहे.”
भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोणाची नावे चर्चेत?
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यास भाजप बिहारमध्ये पहिल्यांदाच ‘ड्रायव्हिंग सीट’वर येणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा सुरू आहे:
- सम्राट चौधरी: सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे प्रभावी नेते.
- नित्यानंद राय: केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि अमित शाह यांचे विश्वासू सहकारी. ते यादव समाजातून येतात.
- संजीव चौरसिया: पाटण्यातील दिघा मतदारसंघाचे आमदार.
नितीश कुमार यांचा विक्रमी प्रवास
75 वर्षीय नितीश कुमार हे बिहारचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विक्रमी 10 वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 2015 पासून ते सतत सत्तेत आहेत. सायकल योजना, मद्यबंदी आणि महिला मतदारांवरील पकड यामुळे त्यांनी अनेकदा राजकीय पंडितांना खोटे ठरवत सत्ता राखली आहे.
मात्र, वाढते वय आणि भाजपचा राज्यातील वाढता दबाव यामुळे आता बिहारमध्ये खऱ्या अर्थाने नव्या युगाची सुरुवात होताना दिसत आहे. पुढील आठवड्यात नितीश कुमार आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा देऊ शकतात, असे बोलले जात आहे.
हे देखील वाचा – US Iran Conflict : हिंदी महासागरात युद्धाचा भडका! अमेरिकने इराणची युद्धनौका उडवली; व्हिडिओ आला समोर










