ओमर अब्दुल्ला सरकारचा मोठा निर्णय! थेट पहलगाममध्ये होणार मंत्रिमंडळाची बैठक

Jammu Kashmir cabinet Meeting in Pahalgam

Jammu Kashmir cabinet Meeting in Pahalgam | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय घेला आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर (पुन्हा पर्यटकांचा विश्वास मिळवण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) आणि त्यांचे मंत्रिमंडळ (cabinet) दोन दिवसांसाठी श्रीनगर (Srinagar) बाहेर, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बैठक घेणार आहेत.

जम्मू-काश्मीरचे (J&K) संपूर्ण मंत्रिमंडळ आणि वरिष्ठ नागरी व पोलीस अधिकारी श्रीनगरच्या नागरी सचिवालयाऐवजी पहलगाममधील (Pahalgam) एका रिसॉर्टमध्ये बैठक घेणार आहेत. काही आठवड्यांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्री सल्लागार नासिर अस्लम वानी यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की, “जर आपण स्वतः या ठिकाणी गेलो नाही, तर पर्यटकांचा आत्मविश्वास कसा वाढेल? बैठकांचा उद्देश केवळ स्थितीचा आढावा घेणं नाही, तर प्रत्यक्ष भेटीमधून सकारात्मक संदेश देणंही आहे.”

मुख्यमंत्री अब्दुल्ला स्वतः बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार असून, मुख्य सचिव अटल दुल्लू यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. याशिवाय, मंत्रिमंडळ पहलगाममधील पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनाही भेटण्याची शक्यता आहे.

बुधवारी (28 मे) अशीच बैठक उत्तर काश्मीरमधील गुलमर्गच्या एका रिसॉर्टमध्ये आयोजित केली जाणार आहे. या बैठकीसाठी काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिर्दी उपस्थित राहतील.या बैठका अशा वेळी घेतल्या जात आहेत, जेव्हा काश्मीर खोऱ्यातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. स्थानिक ट्रॅव्हल एजंट्सनुसार, हल्ल्यानंतर 90% पर्यटक बुकिंग्स रद्द करण्यात आली आहेत.

नुकत्यात दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या (NITI Aayog) बैठकीत, मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी संसदीय समित्यांच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या बैठका थेट जम्मू-काश्मीरमध्ये घेण्याचा सल्ला दिला होता.