ऑपरेशन सिंदूर मुद्दा; संसदेत विरोधक आक्रमक

Opposition aggressive in Parliament over Operation Sindoor issue

नवी दिल्ली- लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terror Attack) चर्चा घेण्याची मागणी करत विरोधकांनी (Opposition) जोरदार गोंधळ घातला. या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब केले.


प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभागृहाबाहेर गेले. त्याच वेळी विरोधी सदस्य आपल्या जागांवर उभे राहत घोषणाबाजी करू लागले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी सदस्यांना शांततेने प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याची विनंती केली, मात्र सदस्यांनी घोषणाबाजी आणि पोस्टर (Poster) दाखवत सभागृहाच्या मध्यभागी आंदोलन सुरू ठेवले. यावेळी अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, जनतेने त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सदस्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या आणि सरकारला जनतेशी संबंधित मुद्द्यांची उत्तरे देऊ द्या. संसद म्हणजे घोषणाबाजीचे ठिकाण नाही. गोंधळ घालायचा असेल, तर बाहेर जा. सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आणि प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. संसद न चालवता गोंधळ घालायचा आहे का? जनता गोंधळ घालण्यासाठी आपल्याला निवडून देत नाही.
राज्यसभेत काँग्रेस (Congress) नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाट आहेत. जम्मू-काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणांचे (Intelligence system) अपयश उपराज्यपालांनी मान्य केले आहे. ऑपरेशन सिंदूर वेळी विरोधकांनी सरकारला पाठिंबा दिला, आता खुलासा हवा. यावर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा (JP Nadda) म्हणाले की, देशात असा संदेश जाऊ नये की सरकार पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू इच्छित नाही. आम्ही सर्व प्रकारे चर्चा करू. ऑपरेशन सिंदूरचे सर्व मुद्दे देशासमोर ठेवले जातील. मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.