Pahalgam Attack: 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या ‘ओव्हरग्राउंड वर्कर’ मोहम्मद युसूफ कटारी याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. कटारीच्या अटकेत एका सामान्य फोन चार्जरने अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून भूमिका बजावली, ज्यामुळे तपास पथकाला या प्रकरणाचा छडा लावणे शक्य झाले.
चार्जरमुळे झाला मोठा खुलासा
जुलै महिन्यात श्रीनगरच्या बाहेरील झबरवानपर्वताच्या पायथ्याशी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. या कारवाईदरम्यान घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंचे सखोल फॉरेन्सिक विश्लेषण करण्यात आले. यावेळी पोलिसांना अर्धवट नष्ट झालेला अँड्रॉइड फोनचा चार्जर मिळाला.
या चार्जरचा माग काढत पोलिसांनी त्याच्या मूळ मालकापर्यंत संपर्क साधला. मालकाने तो फोन एका डीलरला विकल्याची माहिती दिली, ज्या माहितीच्या आधारे पोलिस अखेरीस 26 वर्षीय मोहम्मद युसूफ कटारीपर्यंत पोहोचले.
दहशतवाद्यांना मदत करण्यातील कटारीची भूमिका
कटारीवर पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी सुलेमान, जीब्रान आणि हम्जा अफगाणी यांना महत्त्वाची रसद पुरवल्याचा आरोप आहे. तपासकर्त्यांच्या माहितीनुसार, कटारीने झबरवानच्या डोंगराळ भागात दहशतवाद्यांची चार वेळा भेट घेतली होती.
त्याने दहशतवाद्यांना दुर्गम पर्वतीय मार्गांमध्ये मार्गदर्शन केले आणि लपून बसलेले असतानाही त्यांना संपर्क साधता यावा यासाठी स्मार्टफोन चार्जरसह अन्य साहित्य पुरवले. कटारी हा दुर्गम भागात फिरणाऱ्या भटक्या विद्यार्थ्यांना शिकवत असे आणि त्यामुळे तो दहशतवादी गटासाठी एक महत्त्वाचा स्रोत बनला.
तपास आता NIA कडे जाण्याची शक्यता
कटारीच्या अटकेमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी समर्थन नेटवर्कउद्ध्वस्त करण्याच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. सूत्रांनुसार, पहलगाम हल्ल्यामागील व्यापक कटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) लवकरच हे प्रकरण सोपवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच एनआयएने याच दहशतवादी गटाला आश्रय आणि मदत पुरवल्याच्या आरोपाखाली इतर दोघांना अटक केली आहे.
हे देखील वाचा – टॉस फिक्सिंग? भारत-पाकिस्तान सामन्यात नक्की काय घडले? मॅच रेफरीकडून मोठी चूक