Asim Munir | अमेरिकेचं नक्की चाललयं काय? 250व्या ‘आर्मी डे’ कार्यक्रमासाठी पाकच्या असीम मुनीरला आमंत्रण

Asim Munir US Visit

Asim Munir US Visit | पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सैयद असीम मुनीर अहमद शाह (General Syed Asim Munir Ahmed Shah) अमेरिकन लष्कर दिनाच्या (US Army Day) 250व्या वर्धापन दिन समारंभासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येत्या 14 जून ला वॉशिंग्टन डी.सी. येथे लष्कर दिनाचे अमेरिकेकडून आयोजन केले जाणार असून, यावेळी असीम मुनीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकतात.

जनरल मुनीर 12 जून रोजी अमेरिकेत दाखल होणार असून, ते इतर लष्करी नेत्यांसह या कार्यक्रमात सहभागी होतील, असे वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासातील (Pakistani Embassy) सूत्रांनी सांगितले.

या भेटीमुळे भारतात संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी या आमंत्रणावर तीव्र टीका करत याला भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेसाठी धक्का म्हटले आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी जनरल मुनीर यांच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच्या प्रक्षोभक विधानांचा उल्लेख केला.

त्यांनी अमेरिकेच्या यूएस सेंट्रल कमांडच्या प्रमुखांच्या विधानावरही आक्षेप घेतला, ज्यांनी पाकिस्तानला दहशतवादविरोधी मोहिमेत ‘महान भागीदार’ म्हटले होते. जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिसादावर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “हा भारतासाठी राजनैतिक धक्का नाही का?”

या भेटीत अमेरिककडून पाकिस्तानला अफगाणिस्तान आणि भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्याचे आवाहन केले जाऊ सकते. हे आमंत्रण अमेरिका-चीन स्पर्धा आणि पाकिस्तानच्या सामरिक महत्त्वाशी जोडलेले आहे. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर (CPEC) आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह यांमुळे पाकिस्तानचे चीनशी जवळचे संबंध असल्याने अमेरिकेला पाकिस्तानच्या तटस्थतेबाबत चिंता आहे.

भू-राजकीय परिस्थितीमुळे अमेरिका पाकिस्तानला विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून पाहण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानात या भेटीला राजकीय विरोध होत आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने मुनीर यांच्या भेटीविरोधात निषेध व्यक्त केला आहे.