पाकिस्तानसाठी हेरगिरी केली, दिल्ली-गुजरातमधून दोघांना अटक

नवी दिल्ली – पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून दोघांना अटक केली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दिल्लीतील सीलमपूर परिसरातून मोहम्मद हारून (४५) याला अटक केली. मोहम्मद हारून हा भंगार विक्रेता आहे. तर गुजरात एटीएसने कच्छच्या सीमावर्ती भागातून सहदेव सिंह गोहिल या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याला अटक केली.

हारूनचे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंध होते. त्याने भारतातील अंतर्गत सुरक्षेसंबंधी गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीला पुरवले,असा गुजरात एटीएसचा आरोप आहे. हारून दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील एका कर्मचाऱ्यासोबत थेट संपर्कात होता. त्याच्या बँक खात्याचा वापर करून पैसे व्यवहार केले जात होते, असेही तपासातून निष्पन्न झाले आहे.

गुजरात एटीएसने अटक केलेला सहदेव सिंह गोहिल अदिती भारद्वाज नावाच्या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता. सहदेवने फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वतःच्या नावावर घेतलेले सिम कार्ड भारद्वाजला ओटीपीद्वारे दिले होते. या सिमद्वारे भारतातील संवेदनशील माहिती, विशेषतः बीएसएफ, भारतीय नौदल व सीमावर्ती भागांशी संबंधित माहिती पाकिस्तानला पाठवली जात होती. या हेरगिरीच्या बदल्यात त्याला सुमारे ४०,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले,असा एटीएसचा दावा आहे.