Pakistan weighs shifting Army HQ from Chaklala to Islamabad | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदल घेत भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळं उद्धवस्त केली होती. भारतीय हवाई दलाने नूर खान हवाई तळावर केलेल्या अचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती. या हल्ल्यात झालेल्या गंभीर नुकसानीनंतर, रावळपिंडीतील चकलाला परिसरात असलेले आर्मी जनरल हेडक्वार्टर्स (GHQ) इस्लामाबादमध्ये हलवण्याचा विचार पाकिस्तानकडून सुरू आहे.
रिपोर्टनुसार, भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता पाकिस्तान त्यांचे लष्करी मुख्यालय इतर ठिकाणी हलवण्याचा विचार करत आहे. हे मुख्यालय रावळपिंडीवरून इस्लामाबाद येथे हलवले जाणार आहे.
सध्या लष्करी मुख्यालयाच्या आसपासची वाढती असुरक्षितता आणि नूर खान तळाजवळील अपुरी सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता, पाकिस्तान लष्कर उच्चस्तरीय बदलांचा विचार करत आहे. इस्लामाबादपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेला नूर खान हवाई तळ अत्यावश्यक लष्करी उड्डाणे, टेहळणी यंत्रणाआणि इंधन भरणा युनिट्ससाठी महत्त्वपूर्ण आहे.
चीनच्या MIZAZVISION आणि भारताच्या Kawa Space या कंपन्यांच्या उपग्रह छायाचित्रांतून या तळावरील गंभीर नुकसान समोर आले आहे. छायाचित्रांमध्ये तुटलेले इंधन टँकर, कोसळलेले वेअरहाऊस छप्पर आणि मुख्य धावपट्टीजवळ पडलेला मलबा स्पष्टपणे दिसतो.
रिपोर्टनुसार, भारतीय ड्रोन रावळपिंडीत खोलवर घुसल्याने पाकिस्तान लष्कराला मोठा धक्का बसला आहे. यामुळे चीनकडून पुरवण्यात आलेली HQ-9 आणि LY-80 क्षेपणास्त्र प्रणाली देखील दुसरीकडे हलवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
एअर मार्शल ए. के. भारती यांनी “हल्ल्यापूर्वी आणि नंतर” यांची उपग्रह छायाचित्रे सादर केली असून त्यातून नूर खान तळावर झालेल्या नुकसानीचे स्पष्ट चित्रण झाले. या हल्ल्यामुळे पाकिस्तान हवाई दलाचे (PAF) प्रमुख संपर्क आणि कार्यपद्धतीवर परिणाम झाला आहे.
रिपोर्टनुसार, हल्ल्यानंतर पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल असीम मुनीर यांना पहाटे लष्करी मुख्यालयामधील सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आले होते. पुढील संभाव्य हल्ल्यांच्या भीतीने ही कारवाई करण्यात आली.
नूर खान तळ हे पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजनच्या अत्यंत जवळ असल्याने त्याचे सामरिक महत्त्व अधिक होते. ही यंत्रणा 170 हून अधिक अण्वस्त्रांचे (nuclear warheads) नियंत्रण करते. दरम्यान, मुख्यालयाच्या स्थळांतराबाबत पाकिस्तान सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरी वरिष्ठ लष्करी नेतृत्व संभाव्य ठिकाणांचा विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.