‘आमच्याकडे फक्त 30 सेकंद होते…’, भारताच्या ‘ब्रह्मोस’ने पाकिस्तानला हादरवले होते; स्वतः पाकच्या नेत्याने दिली कबुली

BrahMos Missile

BrahMos Missile | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकस्थित दहशतवादी तळं उद्धवस्त केली होती. भारताने केलेल्या कारवाईत भारताच्या क्षेपणास्त्राने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता भारताने डागलेल्या ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राने (BrahMos Missile) पाकिस्तानच्या लष्कराला हादरवले, अशी धक्कादायक कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी दिली.

राणा सनाउल्लाह यांनी सांगितले की, नूर खान हवाई तळावर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रात अणुबॉम्ब आहे की नाही, हे ठरविण्यासाठी पाकिस्तानकडे फक्त 30 ते 45 सेकंद होते.

“जेव्हा भारताने नूर खान हवाई तळावर (Nur Khan Airbase) ब्राह्मोस डागले, तेव्हा पाकिस्तानच्या लष्कराकडे येणारे क्षेपणास्त्र अणुबॉम्ब घेऊन आले आहे का, हे विश्लेषण करण्यासाठी फक्त 30-45 सेकंद होते. अवघ्या 30 सेकंदात यावर काही निर्णय घेणे ही एक धोकादायक परिस्थिती होती,” असे सनाउल्लाह यांनी एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलला सांगितले.

ते म्हणाले की, “30 सेकंदात क्षेपणास्त्र अण्वस्त्र आहे की नाही, हे ठरवणे धोकादायक होते. चुकीच्या गैरसमजामुळे जागतिक अणुयुद्ध सुरू होऊ शकले असते.”

ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने नूर खान, सरगोधा, भोळारी, जेकोबाबाद, सुक्कुर आणि रहीम यार खान येथील पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले करून धावपट्ट्या, हँगर आणि इमारतींचे मोठे नुकसान केले. भारतीय लष्कराने लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी गटांचे तळ उद्ध्वस्त करून 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

चार दिवसांच्या तीव्र सीमापार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर दोन्ही देशांनी लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्यासाठी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला होता.