Asif Ali Zardari : पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचे नेतृत्व पुन्हा एकदा युद्धाची तयारी करत असल्याचा दावा करत, त्यांनी संघर्षाचा मार्ग सोडून पुन्हा चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन केले आहे.
भारताला चर्चेचे आवाहन आणि काश्मीरचा मुद्दा
झरदारी यांनी आपल्या भाषणात भारताला शांततेचा सल्ला दिला. भारतीय नेते युद्धाची भाषा करत आहेत, परंतु प्रादेशिक शांततेसाठी हे योग्य नाही, असे ते म्हणाले. प्रादेशिक सुरक्षेसाठी भारत आणि पाकिस्तानने युद्धभूमी सोडून अर्थपूर्ण चर्चेसाठी पुढे येणे हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, जोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत दक्षिण आशियात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होणे अशक्य असल्याचे सांगत पाकिस्तान काश्मीरला आपला राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा कायम ठेवेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सिंधू जल करारावरून भारतावर टीका
भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर झरदारी यांनी कडाडून टीका केली. या कृतीला त्यांनी थेट ‘जल-दहशतवाद’ असे संबोधले. भारत आपल्या राजकीय फायद्यासाठी पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी नवी दिल्लीवर केला. पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमधील तणाव आता अधिक वाढण्याची शक्यता या विधानामुळे निर्माण झाली आहे.
अफगाणिस्तानला दहशतवादावरून कडक इशारा
झरदारी यांनी पाकिस्तानच्या पश्चिमेकडील सीमेवर असलेल्या अफगाणिस्तानलाही सज्जड दम भरला. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही देशाला मोठ्या हल्ल्याचा सामना करावा लागू शकतो.
पाकिस्तानची भूमी पवित्र असून देशाची शांतता भंग करण्यासाठी कोणालाही शेजारील प्रदेशाचा वापर करू दिला जाणार नाही. तालिबान सरकारने दोहा कराराचे पालन करावे आणि अफगाणिस्तानला इतर देशांच्या महत्त्वाकांक्षेची रणभूमी बनू देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक परिस्थिती आणि अंतर्गत गदारोळ
पश्चिम आशियातील युद्धाचा निषेध करताना झरदारी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला आणि १९६७ पूर्वीच्या सीमांना पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पुनरुच्चारले. संसदेत हे भाषण सुरू असताना पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या सदस्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करत प्रचंड गोंधळ घातला.











