Pakistan Saudi Arabia Pact: भारताने पाकिस्तानवर युद्ध पुकारल्यास सौदी अरेबिया पाकिस्तानच्या बाजूने लढणार, असे मोठे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले आहे. नुकताच पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये संरक्षण करार झाला आहे.
या करारानुसार युद्धजन्य स्थितीमध्ये एक देश दुसऱ्या देशाची मदत करेल. याच पार्श्वभूमीवर बोलताना पाकच्या मंत्र्यांनी हे वक्तव्य केले. दोन देशांमध्ये नुकत्याच झालेल्या संरक्षण करारामुळे ‘सामरिक परस्पर मदतीचा’ मार्ग खुला झाला आहे, असे ते म्हणाले. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.
नाटोच्या धर्तीवर करार, अण्वस्त्रेही उपलब्ध
युद्धाच्या स्थितीमध्ये सौदी अरेबिया पाकच्या बाजून लढणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी “हो, निश्चितच. यात कोणतीही शंका नाही,” असे उत्त दिले. त्यांनी नाटो (NATO) करारातील कलम 5 चा दाखला दिला.
नाटोमधील एका देशावरील हल्ला हा सर्व सदस्य देशांवरील हल्ला मानला जातो, असे ते म्हणाले. आसिफ यांनी हा करार ‘संरक्षणात्मक’ असल्याचे स्पष्ट केले. “सौदी अरेबिया किंवा पाकिस्तानवर हल्ला झाल्यास आम्ही एकत्र मिळून त्याचा बचाव करू,” असे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियासाठी वापरण्यासाठी उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कराराचे भारताला काय आव्हान?
या करारामुळे रियाधचा पैसा आणि इस्लामाबादची अण्वस्त्रे एकत्र येतील, असे लष्करी आणि राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार आहे. पाकिस्तानला मोठी आर्थिक मदत मिळेल, तर सौदीला एक ‘अण्वस्त्र कवच’ मिळेल.
भारत आणि इराणसह अण्वस्त्रांचा उपयोग करणारा पश्चिम आशियातील एकमेव देश इस्रायलही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या कराराबाबत भारतीय सरकारने म्हटले आहे की, “हा करार दोन्ही देशांमधील जुन्या व्यवस्थेला औपचारिक स्वरूप देतो, आणि त्याचे परिणाम विचारात घेतले जात आहेत.”
हे देखील वाचा – विजेविना जीवन जगणाऱ्या डॉ. हेमा साने यांचे निधन; निसर्गाची ‘एनसायक्लोपिडिया’ म्हणून ओळख