Cyber Attack | दहशतवादी हल्ल्यानंतर सायबर अटॅक! पाकिस्तानी हॅकर्सकडून भारतीय संरक्षण वेबसाइट्सना लक्ष्य

Pakistan Cyber Attack on India

Pakistani Hackers Cyber Attack | पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढलेला असताना, पाकिस्तानी हॅकर्सनी (Pakistani Hackers) भारतीय संरक्षण संस्थांच्या वेबसाइट्सवर (Indian Defence Websites) सायबर हल्ल्यांची मालिका सुरु केली आहे.

यामध्ये संरक्षण कर्मचाऱ्यांचा संभाव्य संवेदनशील डेटा – ज्यामध्ये लॉगिन क्रेडेन्शियल्सचा समावेश असू शकतो. ही माहिती चोरीला गेल्याची शक्यता लष्कराने व्यक्त केली आहे. इंडिया टूडेने याबाबत वृत्त दिले आहे.

लष्करानुसार, ‘पाकिस्तान सायबर फोर्स’ (Pakistan Cyber Force) नावाच्या एका X (ट्विटर) हँडलने ‘मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस’ आणि ‘मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसिस’ या संस्थांचा डेटा मिळवल्याचा दावा केला आहे.

त्याचबरोबर, संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाच्या वेबसाइटवर पाकिस्तानी ध्वज आणि ‘अल खालिद टँक’चे चित्र वापरून विद्रूपकरणाचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ही वेबसाइट तात्पुरती ऑफलाइन करण्यात आली आहे.

सायबर स्पेसमध्ये पाकिस्तानी ‘धोकेबाज घटकां’कडूनआणखी हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता, लष्कराने आणि सायबर सुरक्षा तज्ञांनी सतत देखरेख ठेवली आहे. भविष्यातील कोणतेही धोके ओळखून त्यावर तातडीने उपाय करण्यावर भर दिला जात आहे.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, डिजिटल सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि अशा हल्ल्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या उपायांचा उद्देश सायबर प्रणालीची लवचिकता वाढवणे आणि भविष्यातील सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज ठेवणे हा आहे.

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तान समर्थित सायबर गटांनी भारताविरुद्ध आक्रमक सायबर मोहिमा सुरू केल्या.

‘HOAX1337’ आणि ‘नॅशनल सायबर क्रू’ (National Cyber Crew) या पाकिस्तानी गटांनी जम्मूमधील आर्मी पब्लिक स्कूल्सच्या वेबसाइट्सवर सायबर हल्ला करून पहलगाम हल्ल्याच्या पीडितांची थट्टा करणारे संदेश वेबसाइट्सवर टाकण्याचा प्रयत्न केला होता.

इतर हल्ल्यांमध्ये माजी सैनिकांसाठीच्या आरोग्य सेवा वेबसाइट्स, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, आणि हवाई दलाच्या माजी सैनिकांसाठीच्या वेबसाइट्सचा समावेश होता.

‘आयओके हॅकर’ (IOK Hacker) नावाच्या गटाने श्रीनगर आणि रानीखेतमधील आर्मी पब्लिक स्कूल्स, आर्मी वेल्फेअर हाउसिंग ऑर्गनायझेशन, आणि हवाई दलाच्या प्लेसमेंट पोर्टलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लष्कराच्या रिअल-टाईम मॉनिटरिंग सिस्टीम्स आणि मजबूत फायरवॉल्समुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरले.

Share:

More Posts