Home / देश-विदेश /  Pandurang Sadashiv Khankhoje : क्रांतीची मशाल आणि विज्ञानाचा कुंचला: ‘हिंदू जादूगार’ डॉ. पांडुरंग खानखोजे यांचा विस्मयकारक जीवनप्रवास

 Pandurang Sadashiv Khankhoje : क्रांतीची मशाल आणि विज्ञानाचा कुंचला: ‘हिंदू जादूगार’ डॉ. पांडुरंग खानखोजे यांचा विस्मयकारक जीवनप्रवास

Pandurang Sadashiv Khankhoje : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर काहींनी परदेशात राहून ज्ञानाच्या जोरावर शत्रूला...

By: Team Navakal
 Pandurang Sadashiv Khankhoje
Social + WhatsApp CTA

 Pandurang Sadashiv Khankhoje : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर काहींनी परदेशात राहून ज्ञानाच्या जोरावर शत्रूला सळो की पळो करून सोडले. अशाच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे. बालपणापासूनच ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न पाहणारा हा सुपुत्र पुढे मेक्सिकोमध्ये जाऊन तिथल्या कृषी क्षेत्राचा तारणहार ठरला. क्रांती आणि कृषी विज्ञान या दोन भिन्न क्षेत्रांत त्यांनी उमटविलेला ठसा आजही जगासाठी विस्मयकारक आहे.

बालपण आणि क्रांतीची ठिणगी-
७ नोव्हेंबर १८८४ रोजी जन्मलेल्या पांडुरंग यांना देशभक्तीचे बाळकडू त्यांच्या आजोबांकडून मिळाले. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील योद्ध्यांच्या कथा ऐकत ते मोठे झाले. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी (१८९१ मध्ये) ब्रिटिशांविरुद्ध भिल्ल सेना उभी करण्यासाठी ते जंगलात निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना पकडून पुन्हा घरी आणले. शिक्षणानिमित्त नागपुरात असताना त्यांनी स्वदेशी वस्तूंचे दुकान सुरू केले. १९०३ मध्ये इंग्लंडच्या युवराजांच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ वाटलेली मिठाई त्यांनी तिरस्काराने फेकून दिली, ज्याचा परिणाम म्हणून त्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले. प्लेगच्या साथीच्या काळात ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा इंग्रजांवरील राग अनावर झाला आणि ‘वंदे मातरम्’च्या उद्घोषासाठी त्यांना पुन्हा एकदा शाळेतून बाहेर काढण्यात आले.

अज्ञाताचा प्रवास आणि जागतिक संघर्ष-
सशस्त्र क्रांतीसाठी आधुनिक स्फोटकांचे ज्ञान मिळवणे अनिवार्य आहे, या विचाराने त्यांनी मातृभूमी सोडली. जपान आणि चीनमार्गे ते अमेरिकेत पोहोचले. या प्रवासात त्यांनी अनेक साम्राज्यविरोधी नेत्यांशी चर्चा केली. अमेरिकेतील बर्कली येथे राहताना त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून सर्व प्रकारची कष्टाची कामे केली. एकाच वेळी कृषी महाविद्यालय आणि लष्करी महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी दोन्ही पदव्या संपादन केल्या. ब्रिटिशांच्या गुप्तहेरांपासून वाचण्यासाठी ते मेक्सिकोला गेले, जिथे त्यांनी ‘गदर’ चळवळीच्या मराठी आवृत्तीचे संपादन केले आणि स्फोटकांच्या निर्मितीत यश मिळवले.

मेक्सिकोचा ‘हिंदू जादूगार’-
पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर त्यांनी इराणमध्ये मुस्लिम नाव धारण करून अनेक भूभाग स्वतंत्र केले, परंतु ब्रिटिशांच्या कुटिलनीतीमुळे त्यांना दोनदा अटक झाली. पुन्हा मेक्सिकोला परतल्यावर त्यांनी आपले लक्ष पूर्णपणे कृषी संशोधनावर केंद्रित केले. त्यांनी ‘तेवोसिंतले’ या रानटी तणाचा मक्यासोबत संकर घडवून ‘तेवोमका’ हा नवा वाण विकसित केला. या एकाच रोपाला तब्बल ३० कणसे लागत असत, ज्यामुळे मेक्सिको अन्नाबाबत स्वयंपूर्ण झाला. त्यांच्या या किमयेमुळे मेक्सिकन जनतेत त्यांची ओळख ‘हिंदू जादूगार’ अशी निर्माण झाली. मका, गहू, रताळी आणि सोयाबीन अशा सुमारे अडीच हजार संकरित वनस्पती तयार करून त्यांनी कृषी विश्वात क्रांती घडवली. मेक्सिकन सरकारने त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.

मातृभूमीकडे परत आणि उपेक्षित अंत-
भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. खानखोजे अत्यंत आशेने मायदेशी परतले, परंतु दुर्दैवाने ब्रिटिशांच्या जुन्या काळ्या यादीतील नावामुळे त्यांना बोटीतून उतरताच अटक करण्यात आली. सुटकेनंतर त्यांनी भारतीय कृषी धोरणाबाबत अनेक मोलाचे अहवाल सादर केले. सीमेवरील बर्फाळ भागात शेती करून सीमांचे रक्षण करण्याचा त्यांचा प्रस्ताव तत्कालीन सरकारने धुडकावून लावला. ज्या शास्त्रज्ञाने मेक्सिकोला जगाच्या नकाशावर कृषी संपन्न केले, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्याची संधी स्वतंत्र भारताने गमावली. मातृभूमीच्या सेवेची तीव्र ओढ असणाऱ्या या महान संशोधकाचे १८ जानेवारी १९६७ रोजी निधन झाले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या