Gopal Khemka | बिहारच्या पाटणा येथे भाजप नेते आणि प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका (Gopal Khemka) यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गांधी मैदान (Gandhi Maidan) परिसरातील ‘पनाश’ हॉटेलजवळील ट्विन टॉवर सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली.
या हत्येने बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रश्नचिन्हांकित झाली आहे. खेमका यांच्या मुलाची, गुंजन खेमका यांची, तीन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने हत्या झाल्याने हा विषय अधिक गंभीर बनला आहे.
शुक्रवारी रात्री 11:40 वाजेच्या सुमारास गोपाल खेमका आपल्या ट्विन टॉवर सोसायटीतील घराकडे परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. खेमका कारमधून उतरताच हल्लेखोरांनी हा हल्ला केला आणि तात्काळ पळ काढला. गोळी लागल्याने खेमका यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांना घटनास्थळावरून एक गोळी आणि रिकामे काडतूस सापडले आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितले, “4 जुलैच्या रात्री, गांधी मैदानाच्या दक्षिण भागात गोपाल खेमका यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, परिसराला घेराव घालण्यात आला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.”
या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. बिहार पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून, तपासाला गती देण्यात आली आहे. खेमका यांचे बंधू शंकर यांनी पोलिसांच्या उशिरा प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली, कारण पोलीस घटनास्थळी तीन तासांनी पोहोचले.
पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी घटनास्थळी भेट देत नितीश कुमार सरकारवर टीका केली. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “बिहारमध्ये कोणीही सुरक्षित नाही. जर गुंजन खेमकांच्या हत्येवेळी सरकारने कठोर कारवाई केली असती, तर आज ही घटना टळली असती.” त्यांनी बिहारला गुन्हेगारांचे अभयारण्यआणि नितीश सरकारला “गुंडाराज” संबोधले.
गोपाल खेमका हे मगध हॉस्पिटलचे मालक आणि बिहारमधील प्रसिद्ध व्यावसायिक होते. ते भाजपशी संलग्न होते आणि बँकीपोर क्लबचे संचालक होते. त्यांचा मुलगा गुंजन खेमका यांची, 2018 मध्ये वैशाली येथे अशाच पद्धतीने हत्या झाली होती.