Petroleum Minister's press conference : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाईच्या चर्चा सुरू असतानाच, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेऊन सर्व शंकांचे निरसन केले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची (Panic) आवश्यकता नाही. मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती देत जनतेला आश्वस्त केले आहे.
इंधन साठा मुबलक; सीएनजी आणि पीएनजी पुरवठा सुरळीत-
मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी माहिती दिली की, देशात सध्या इंधनाची कोणतीही कमतरता नाही. विशेषतः घरगुती वापरासाठी लागणारा एलपीजी (LPG), वाहनांसाठीचा सीएनजी (CNG) आणि पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू (PNG) यांचा पुरवठा १०० टक्के सुरळीत सुरू आहे. वितर साखळीमध्ये कोणताही अडथळा नसून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इंधन उपलब्ध करून दिले जात आहे.
वितरण व्यवस्था सक्षम; उत्पादनात ३० टक्क्यांची वाढ-
देशभरात सध्या २५,००० वितरकांचे जाळे कार्यरत असून, कोणत्याही वितरकाकडे गॅसची टंचाई नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. दररोज सुमारे ७५,००० सिलेंडरचे बुकिंग होत असून, ही मागणी पूर्ण करण्याची क्षमता यंत्रणेकडे आहे. भविष्यातील निकड लक्षात घेऊन सरकारने एलपीजीच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ केली आहे, जेणेकरून वाढत्या मागणीला चोख प्रत्युत्तर देता येईल. कोणाकडेही गॅसचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी उत्पादन स्तरावर घेतली जात आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकार सज्ज-
इंधन टंचाईच्या अफवांचा फायदा घेऊन काही समाजकंटकांकडून इंधनाचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर सुजाता शर्मा यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, इंधनाचा काळाबाजार रोखणे आणि पारदर्शक वितरण सुनिश्चित करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सरकारी यंत्रणा सर्व वितरकांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
नागरिकांना आवाहन: संयम पाळा आणि अफवांना रोखा-
पेट्रोलियम मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश नागरिकांमधील भीती दूर करणे हा होता. देशात उत्पादनापासून वितरणापर्यंतची सर्व साखळी सुरक्षित असून, लोकांनी अतिरिक्त साठा करण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. “इंधनाचा साठा मुबलक आहे, त्यामुळे कोणाही नागरिकाने हवालदिल होऊ नये,” असे सुजाता शर्मा यांनी आवर्जून नमूद केले.










