PM Modi Assam Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम दौऱ्यादरम्यान ईशान्य भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधानांनी सी-130जे या विमानाने आसाममधील मोरान येथील राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या 4.2 किलोमीटर लांबीच्या आपत्कालीन लँडिंग सुविधेवर (ELF) यशस्वी लँडिंग केले.
चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) हा भाग अवघ्या काही शंभर किलोमीटर अंतरावर असून युद्धकाळात ही सुविधा गेमचेंजर ठरू शकते.
हायवे बनला हवाई दलाची धावपट्टी
दिब्रुगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-127 वरील 4.2 किमीचा हा पट्टा भारतीय हवाई दलाच्या समन्वयाने विकसित करण्यात आला आहे. सुमारे 100 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या धावपट्टीवर 40 टनांपर्यंतची लढाऊ विमाने आणि 74 टनांपर्यंतची मालवाहू विमाने उतरू शकतात. उद्घाटनापूर्वी हवाई दलाच्या राफेल आणि सी-17 ग्लोबमास्टर विमानांनी येथे सराव केला होता. लँडिंगनंतर पंतप्रधानांनी तेजस, सुखोई आणि राफेल या विमानांचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिक पाहिले.
संरक्षण क्षेत्रातील महत्त्व
- सीमेजवळ जलद तैनाती: चीन सीमेजवळ असल्याने आणीबाणीच्या काळात किंवा युद्धप्रसंगी सैन्य आणि रसद वेगाने पोहोचवण्यासाठी या सुविधेचा वापर होईल.
- हवाई तळांना पर्याय: युद्धाच्या वेळी जर मुख्य हवाई तळांवर हल्ला झाला किंवा ते निकामी झाले, तर हा हायवे विमानांच्या उड्डाणासाठी आणि लँडिंगसाठी एक भक्कम पर्याय म्हणून काम करेल.
- रसद आणि इंधन पुरवठा: या ठिकाणी उतरलेल्या विमानांमध्ये वेगाने इंधन भरण्याची आणि शस्त्रास्त्रे बसवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
- नैसर्गिक आपत्तीत मदत: पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदत साहित्य पोहोचवण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी या धावपट्टीचा मोठा फायदा होईल.
चीनला चोख प्रत्युत्तर
2020 मधील गलवान संघर्षानंतर भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. चीनने सीमेवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, त्याला भारताने दिलेले हे सामरिक उत्तर मानले जात आहे. 1962 च्या युद्धावेळी आसाममधील रस्ते आणि हवाई सुविधा कमकुवत होत्या, ती उणीव आता भरून काढण्यात आली आहे. भारतात यापूर्वी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये अशा सुविधा कार्यान्वित आहेत.










