Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठीराजधानी दिल्लीत दाखल झाले. युक्रेनविरुद्धचे युद्ध सुरू झाल्यानंतर आणि 2021 नंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि रशियामधील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य राजशिष्टाचार बाजूला ठेवत स्वतः पालम विमानतळ गाठले आणि पुतिन यांचे जोरदार स्वागत केले.
सायंकाळी पुतिन यांचे विमान पालम विमानतळावर उतरल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी पुढे येत त्यांचे हस्तांदोलन केले आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी कडकडून मिठी मारली. रशियन प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता मोदींनी थेट विमानतळावर हजेरी लावल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांचे महत्त्व अधोरेखित झाले.
‘MH 01’ पासिंगची गाडी चर्चेत
सामान्यतः राष्ट्राध्यक्ष पुतिन जगभर कुठेही प्रवास करताना त्यांच्या रशियन बनावटीच्या ‘ऑरस सेनात लिमोझिन’ (Aurus Senat Limousine) या विशेष गाडीतून प्रवास करतात. भारत दौऱ्यासाठीही ते तीच गाडी आणतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही.
या उत्साही भेटीनंतर, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन हे टोयोटा फॉर्च्युनर या एसयूव्हीमध्ये (SUV) बसून विमानतळावरून पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाकडे खासगी डिनरसाठी रवाना झाले. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांनी ज्या पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमधून प्रवास केला, तिचा नोंदणी क्रमांक MH 01 EN 5795 असा होता. ‘MH 01’ हे पासिंग महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरासाठी दिले जाते, ज्यामुळे ही गाडी मुंबई पासिंगची असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गाडीच्या या नंबर प्लेटची विशेष चर्चा रंगली.
#WATCH | Prime Minister Narendra Modi and Russian President Vladimir Putin travel in the same car, as they depart from the Palam Technical Airport in Delhi
— ANI (@ANI) December 4, 2025
President Putin is on a two-day State visit to India. He will hold the 23rd India-Russia Annual Summit with PM Narendra… pic.twitter.com/7Qz2cHOtnx
टोयोटा फॉर्च्युनरची निवड आणि सुरक्षेचे कारण
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात सामान्यतः बीएमडब्ल्यूसारख्या (BMW) विशेष गाड्या असतात, तर पुतिन स्वतःच्या खासगी गाडीतून प्रवास करतात. मात्र या भेटीत वापरलेली फॉर्च्युनर ही पंतप्रधानांच्या ताफ्यातील अधिकृत गाडी नव्हती. त्यामुळे MH 01 पासिंग असलेल्या एका जपानी कंपनीच्या गाडीतून प्रवास करण्यामागे सुरक्षा कारण असण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय माध्यमांनी वर्तवली आहे.
या खास एसयूव्हीची वैशिष्ट्ये:
- सुरक्षितता: ही दिसायला जरी साधी 4X2 डिझेल मॅन्युअल फॉर्च्युनर वाटत असली, तरी पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी यात बुलेटप्रूफिंग (Bulletproofing) आणि उत्कृष्ट सुरक्षा फीचर्स जोडलेले आहेत.
- इंजिन: यात 2755 सीसीचे टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे, जे सुमारे 201 बीएचपीची (BHP) ताकद आणि 420 न्यूटन मीटरचा (Nm) टॉर्क निर्माण करते.
- इतर फीचर्स: ही 7 सीटर एसयूव्ही मजबूत बिल्ड क्वालिटी, 7 एअरबॅग्ज, क्रूझ कंट्रोल (Cruise Control), व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (Automatic Climate Control) यांसारख्या फीचर्समुळे ओळखली जाते.









