PM Modi expected to visit China: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान चीनच्या (PM Modi expected to visit China) दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहेत. या दौऱ्यात ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
2018 नंतर आणि पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा असेल. या परिषदेनंतर ते वार्षिक शिखर बैठकीसाठी जपानलाही (Japan) भेट देण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला भेट दिली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या शिखर परिषदेसाठी चीनचा दौरा करण्याची शक्यता आहे.
एससीओ या गटामध्ये भारत, चीन, रशिया, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस हे दहा देश सदस्य आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये कझान येथे झालेल्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली होती. ही त्यांची 2019 नंतरची पहिली औपचारिक भेट होती. आता चीन दौऱ्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
या वर्षी जूनमध्ये, भारत आणि चीनने लडाखमधील सीमावाद संपल्यानंतर द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील विशिष्ट समस्यांवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली होती. या चर्चेनंतर दोन्ही देशांनी 2020 पासून थांबलेली थेट विमान सेवा पुन्हा सुरू करण्यास गती देण्याचेही ठरवले आहे.
भारत-चीन संबंध आणि दहशतवाद
या वर्षी जूनमध्ये चीनच्या किंगदाओ येथे झालेल्या एससीओ (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिला होता. या निवेदनात 22 एप्रिलच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) उल्लेख नव्हता, पण पाकिस्तानातील’जाफर एक्स्प्रेस हायजॅकिंग’चा उल्लेख होता. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी या निवेदनावर सही केली नाही.
मात्र, अमेरिकेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना (FTO) म्हणून घोषित केल्यानंतर चीनने या हल्ल्याचा निषेध केला. चीनने दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.