PM Modi New Record: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एका सुवर्ण अध्यायाची नोंद केली आहे. निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून देशात सर्वाधिक काळ सेवा देणारे ते पहिले भारतीय नेते ठरले आहेत. या कामगिरीसह त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
२५ व्या वर्षात पदार्पण आणि नवा विक्रम
पवन कुमार चामलिंग यांनी मुख्यमंत्री म्हणून 8,930 दिवस पद भूषवले होते. पंतप्रधान मोदींनी आता सत्तेतील 8,931 दिवस पूर्ण केले असून त्यांनी हा जुना विक्रम मागे टाकला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान या दोन्ही जबाबदाऱ्या मिळून मोदींनी आता सत्तेतील २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सलग दशकांपासून जनतेचा विश्वास संपादन करत सर्वोच्च पदावर राहणे, ही जागतिक राजकारणातील एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.
राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे
- गुजरातचे मुख्यमंत्री: ७ ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सलग १३ वर्षांहून अधिक काळ त्यांनी राज्याचे नेतृत्व केले.
- भारताचे पंतप्रधान: २६ मे 2014 रोजी त्यांनी देशाचे १४ वे पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळली.
- सलग तीन विजय: 2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून त्यांनी आपली राजकीय पकड सिद्ध केली आहे.
- स्वातंत्र्योत्तर जन्म: स्वतंत्र भारतात जन्मलेले ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. तसेच, दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा सत्तेत येणारे ते पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले आहेत.
डिजिटल जगातही मोदींचाच डंका
केवळ प्रत्यक्ष राजकारणातच नव्हे, तर सोशल मीडियाच्या जगातही पंतप्रधान मोदींनी या महिन्यात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत:
- YouTube: त्यांच्या चॅनेलने ३ कोटी (30 Million) सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला असून, जगात सर्वाधिक फॉलो केले जाणारे ते एकमेव राजकीय नेते आहेत.
- Instagram: फेब्रुवारीमध्ये त्यांनी १० कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला. सध्या त्यांचे इन्स्टाग्रामवर १०.१ कोटी फॉलोअर्स आहेत.
- X (ट्विटर): ‘एक्स’वर त्यांचे १०.६४ कोटी फॉलोअर्स असून जागतिक नेत्यांच्या यादीत ते आघाडीवर आहेत.
देशांतर्गत राजकारण असो वा आंतरराष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क, नरेंद्र मोदी यांची मोहिनी आजही कायम असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.









