PM Modi – Indira Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (25 जुलै) पंतप्रधानपदावर (Longest Serving PM) सलग 4,078 दिवस पूर्ण केले आहेत. यासह त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा (Indira Gandhi) सलग कार्यकाळाचा विक्रम मोडला आहे. आता मोदींपेक्षा जास्त दिवस पंतप्रधान राहण्याची कामगिरी केवळ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे.
इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 पासून 24 मार्च 1977 या कालावधीत सलग 4,077 दिवस पंतप्रधानपद सांभाळले होते. मोदींचा हा कार्यकाळ एकाच आणि अखंडित स्वरूपात आहे.
नेहरू यांच्यानंतर मोदींचे दुसरे स्थान
या नव्या विक्रमामुळे नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सलग कार्यकाळ गाठणारे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्यापुढे केवळ देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत. नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत सलग सुमारे 17 वर्षे पंतप्रधानपद भूषवले होते.
नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर भारतात जन्मलेले पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत. ते बिगर-काँग्रेस पक्षाचे असूनही सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहिलेले आहेत. तसेच, बिगर-हिंदी भाषिक राज्यातून निवडून आलेले असूनही त्यांनी सलग दोन कार्यकाळ पूर्ण केले आणि तिसऱ्यांदा बहुमताने पुन्हा सत्तेवर आले.
मोदी हे लोकसभेत स्वतःच्या पक्षाच्या बळावर बहुमत मिळवणारे पहिले बिगर-काँग्रेस पंतप्रधान आहेत. 1971 नंतर प्रथमच, विद्यमान पंतप्रधान म्हणून मोदींनी पूर्ण बहुमताने पुन्हा सत्ता मिळवली आहे. नेहरू वगळता, सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकणारे ते एकमेव पंतप्रधान ठरले आहेत.
गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास
गुजरातमधील वडनगर येथे सामान्य कुटुंबात जन्मलेले नरेंद्र मोदी यांनी बालपणात वडिलांसोबत रेल्वे स्थानकावर चहा विकला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि नंतर भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 2002, 2007 आणि 2012 मध्ये सलग तीन वेळा विजय मिळवल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली.
2014 मध्ये त्यांनी भाजपाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर 2019 व 2024 मध्येही त्यांनी पक्षाला पूर्ण बहुमत मिळवून दिले. त्यामुळे एकूण सहा प्रमुख निवडणुकांमध्ये सलग यश मिळवणारे ते एकमेव नेते ठरले आहेत.