इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानात आंदोलन सुरू

Protests began in Pakistan for Imran Khan's release

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील (Pakistan) प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्या सुटकेसाठी देशव्यापी आंदोलन सुरू केल्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाची औपचारिक सुरुवात पक्षाचे नेते लाहोरमध्ये एकत्र जमून करण्यात आली. खैबर पख्तूनख्वाचे (KP) मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी हे आंदोलन अधिकृतपणे सुरू झाल्याचे जाहीर करताना सांगितले की, “हे आंदोलन ५ ऑगस्टपर्यंत अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूप धारण करेल. पीटीआयकडून इम्रान खान यांच्यावरील कारवाईला राजकीय सूडभावना ठरवत त्यांच्यावरील खटले मागे घेण्याची आणि त्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी जोर धरत आहे.

पीटीआयचे कार्यवाहक अध्यक्ष बॅरिस्टर गोहर अली खान, केपीचे मुख्यमंत्री आणि पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते मलिक अहमद खान भाचर काल लाहोरमध्ये गेले. त्याआधी, इस्लामाबादमध्ये पक्षनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पंजाब विधानसभेतून निलंबित केलेले २६ आमदार आणि आंदोलनाची रणनीती यावर चर्चा झाली. यावेळी गंडापूर म्हणाले की, लष्कराने बराच काळ देशावर राज्य केले आहे. आता ते अनधिकृत मार्शल लॉ (Martial law) चालवत आहेत. इम्रान यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात ठेवण्यात आले आहे. सर्व प्रांतांमध्ये स्थानिक मुद्द्यांच्या आधारे निदर्शने तीव्र करावी. प्रत्येक यशस्वी चळवळ लाहोरपासून सुरू होते. ही चळवळदेखील देशव्यापी पातळीवर यशस्वी होईल. दरम्यान, आंदोलनाआधीच पंजाब पोलिसांनी शाहदरा मोर आणि इतर भागांत पीटीआय नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकले. पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांना अटक केले.