Pune News : अमेरिका आणि इराण यांच्यात उफाळून आलेल्या भीषण लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर अस्वस्थता पसरली आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका आखाती देशांमधील हवाई वाहतुकीला बसला असून, दुबई विमानतळावरील अनेक उड्डाणे तात्काळ रद्द करण्यात आली आहेत. या विस्कळीत विमानसेवेमुळे शिक्षणासाठी आणि सहलीसाठी दुबईत गेलेले अनेक भारतीय नागरिक तेथे अडकून पडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या ८० विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्रातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शैक्षणिक सहल आणि परतीचा प्रवास रोखला
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका व्यवस्थापनशास्त्र (MBA) महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दुबईच्या दौऱ्यावर गेली होती. यामध्ये एकूण ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, हे सर्व विद्यार्थी १ मार्च रोजी विमानाने भारताकडे प्रस्थान करणार होते. मात्र, मध्यपूर्वेतील हवाई हद्दीत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतून उड्डाण घेणारी सर्व विमाने जमिनीवरच रोखण्यात आली. ऐनवेळी विमानसेवा स्थगित झाल्याने हे विद्यार्थी मायदेशी परतू शकले नाहीत. सद्यस्थितीत हे सर्व विद्यार्थी दुबईत सुरक्षित असले, तरी युद्ध केव्हा थांबणार आणि विमानसेवा केव्हा पूर्ववत होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
हिंगोली आणि रायगडमधील पालकांची आर्त हाक
या अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील खुशी बढेरा ही विद्यार्थिनी असून तिच्या पालकांनी केंद्र सरकारकडे मदतीची याचना केली आहे. “ज्याप्रमाणे युक्रेन युद्धाच्या वेळी भारताने विशेष मोहीम राबवून आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले होते, त्याच धर्तीवर दुबईत अडकलेल्या या ८० मुलांसाठीही केंद्र सरकारने पावले उचलावीत,” अशी विनंती खुशीच्या वडिलांनी केली आहे.
दुसरीकडे, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवासी असलेला उत्कर्ष मपारा हा विद्यार्थीदेखील दुबईत अडकला आहे. उत्कर्ष हा ‘ग्लोबल एमबीए’च्या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी १८ फेब्रुवारी रोजी दुबईला गेला होता. उत्कर्षचे वडील राजेश मपारा यांनी सांगितले की, “उत्कर्ष सध्या सुरक्षित असून तो स्वतंत्र खोलीत राहत आहे. आम्ही त्याच्याशी सातत्याने संपर्कात आहोत, मात्र मध्यपूर्वेतील तणाव पाहता एक पालक म्हणून आम्हाला त्याची प्रचंड काळजी वाटते आहे.”
प्रशासनाकडून अपेक्षा आणि दक्षता
युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात शिक्षण घेत असलेल्या किंवा पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दुबई हे जागतिक हवाई वाहतुकीचे प्रमुख केंद्र असल्याने तेथे हजारो प्रवासी अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, अडकलेल्या प्रवाशांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, पालकांनी सरकारला विनंती केली आहे की, परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना विशेष विमानाद्वारे भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी.










