Punjab Hooch Tragedy | पंजाबच्या (Punjab) अमृतसर जिल्ह्यात (Amritsar district) विषारी दारू प्रकरणाने खळबळ उडवली आहे. कथितरित्या विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. पीडितांपैकी बहुतांशजण मजूर आहेत.
ही घटना अमृतसर ग्रामीण भागातील माजिठा विधानसभा मतदारसंघात घडली असून पीडित व्यक्ती भांगाली, पातलपुरी, मरारी कलां, तलवंडी खुम्मन, कर्नाला, भांगवान आणि थेरेवाल या गावांतील आहेत.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आतापर्यंत या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी साहिब सिंग याने दिल्लीस्थित कंपनीकडून मेथनॉल (methanol) खरेदी केल्याचे उघड झाले आहे. विषारी दारू तयार करण्यासाठी याच रसायनाचा वापर झाला होता.
साहिब सिंगला मेथनॉलचा साठा लुधियानामधील ‘साहिल केमिकल्स’मधून मिळाल्याचे तपासात समोर आले असून त्या कंपनीचे पंकज कुमार उर्फ साहिल आणि अरविंद कुमार हेही आरोपी आहेत. पोलिसांनी प्रभजीत सिंग या वितरकासह अनेकांना ताब्यात घेतले आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेत निष्काळजीपणा केल्याबद्दल माजिठा येथील उप-अधीक्षक अमोलक सिंग आणि स्थानिक स्टेशन हाऊस ऑफिसर अवतार सिंग यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. “हे मृत्यू नाहीत, हे खून आहेत. कोणत्याही राजकीय, नोकरशाही किंवा पोलीस संरक्षकाशिवाय अशी घटना घडू शकत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. त्यांना शक्य ती नोकरीची मदतही करण्यात येईल.
दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्षांनी आम आदमी पार्टी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते प्रताप सिंग बाजवा यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी ही घटना सरकारच्या अपयशाचे प्रतीक असल्याचे म्हटले. शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजीठिया यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांनी दोन्ही एफआयआर भारतीय न्याय संहितेच्या (Bharatiya Nyaya Sanhita) कलम 105 (सदोष मनुष्यवध) आणि 103 (खून) अन्वये नोंदवल्या आहेत. याशिवाय उत्पादन शुल्क कायदा (Excise Act) आणि अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, पटियाला पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाने मिळून केलेल्या कारवाईत 600 लिटर मेथनॉल जप्त करण्यात आला आहे.