Home / देश-विदेश / Rahul Gandhi | ‘मी तिथे नव्हतो, पण…’, 1984 शीख दंगलीवर राहुल गांधींचे मोठे विधान

Rahul Gandhi | ‘मी तिथे नव्हतो, पण…’, 1984 शीख दंगलीवर राहुल गांधींचे मोठे विधान

Rahul Gandhi on 1984 Sikh Riots | काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेतील एका...

By: Team Navakal
Rahul Gandhi on 1984 Sikh Riots

Rahul Gandhi on 1984 Sikh Riots | काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात 1984 च्या शीख विरोधी दंगलीबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. तसेच, काँग्रेसच्या इतिहासातील सर्व चुकांची जबाबदारी स्विकारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

एका शीख युवकांनी 1984 च्या दंगलीबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना “त्या घटनांवेळी मी तिथे नव्हतो, पण काँग्रेसच्या चुकांची जबाबदारी घेण्यास तयार आहे,” असं ठामपणे सांगितलं.

राहुल गांधी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स येथे आयोजित संवाद सत्रात सहभागी झाले होते. त्या वेळी एका शीख युवकाने थेट प्रश्न विचारत काँग्रेसच्या भूतकाळातील निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

युवकाने राहुल गांधींच्या पूर्वीच्या विधानाचा संदर्भ देत विचारलं की, “तुम्ही आम्हाला भाजपच्या काळात भारत कसा असेल याची भीती दाखवता, पण काँग्रेसने आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनेकदा गालबोट लावलं. आनंदपूर साहिब ठरावात फुटीरतेचा उल्लेख नसतानाही काँग्रेसने तो तसा रंगवला.” त्याने माजी काँग्रेस नेते सज्जन कुमारचा उल्लेख करून, “असे अनेक सज्जन कुमार काँग्रेसमध्ये आहेत,” असा आरोप केला.

या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मला वाटत नाही की शीखांना कशाचीही भीती वाटते. “मी जे विधान केले ते हे होते की आपल्याला असा भारत हवा आहे का जिथे लोकांना आपला धर्म व्यक्त करण्यास अस्वस्थ वाटेल? काँग्रेस पक्षाच्या चुकांबद्दल बोलायचं झाल्यास, त्यापैकी बऱ्याच चुका मी तिथे नव्हतो तेव्हा झाल्या, पण काँग्रेस पक्षाने इतिहासात केलेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे.

ते पुढे म्हणाले की, “काँग्रेसने काही चुका केल्या आहेत हे मी मान्य करतो. मी जाहीरपणे मान्य केलं आहे की 1980 च्या दशकातील काही घटना चुकीच्या होत्या. मी सुवर्ण मंदिरालाही अनेक वेळा भेट दिली आहे आणि शीख समुदायाशी माझे दृढ संबंध आहेत.”

दरम्यान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उफाळलेल्या शीख विरोधी हिंसाचारात दिल्लीसह देशभरात सुमारे 3,000 शीख मारले गेले. त्या काळात काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर या हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचे आरोप झाले. याच मुद्द्यावरून काँग्रेसवर अनेकदा टीका केली जाते.

Web Title:
संबंधित बातम्या