Rahul Gandhi – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले असतानाच काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ( Rahul Gandhi) या दौऱ्यावरून सरकारवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, परदेशी पाहुणे भारतभेटीवर येतात, तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्याने त्यांना भेटावे, असा शिष्टाचार आहे. मात्र ही लोकशाही परंपरा असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिचे पालन करत नाहीत. विरोधी पक्षनेत्यांनी परदेशी पाहुण्यांना भेटावे, असे सरकारला वाटत नाही. असुरक्षिततेच्या भावनेतून सरकार विरोधी पक्षनेत्यांना परदेशी पाहुण्यांना भेटू देत नाही.
आज संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सर्वसाधारणपणे परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांनी विरोधी पक्षनेत्यांना भेटण्याची प्रथा आहे. वाजपेयी आणि मनमोहन सिंह सरकारच्या काळात असे होत होते. ही एक लोकशाही परंपरा आहे. पण आजकाल परदेशी पाहुणे भारतात येतात किंवा मी परदेशात प्रवास करतो तेव्हादेखील केंद्र सरकार तिथल्या प्रमुखांना विरोधी पक्षनेत्यांशी न भेटण्याचा सल्ला देते. हे सरकारचे धोरण आहे. ते नेहमीच असे करतात. आमचे सर्वांशी संबंध आहेत. विरोधी पक्षनेते वेगळा दृष्टिकोन देतात. आम्हीदेखील भारताचे प्रतिनिधित्व करतो. परंतु आम्ही परदेशी पाहुण्यांना भेटू नये असे सरकारला वाटते.
राहुल गांधींप्रमाणेच काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनीही यावरून सरकारवर टीका करत म्हटले की, हा अजब प्रकार आहे. कोणत्याही परदेशी मान्यवराने विरोधी पक्षनेत्याला भेटणे हा प्रोटोकॉल आहे. परंतु आता सगळे प्रोटोकॉल उलटे केले जात आहेत. या सरकारची सर्व धोरणे यावर आधारित आहेत. सरकारला असे वाटते की, कुणीही आपल्या विरोधात आवाज उठवू नये. मत मांडू नये. त्यांना काही ऐकायचे नाही. त्यांना लोकशाहीत नेमकी कशाची भीती वाटत आहे, ठाऊक नाही. प्रत्येकाला आपले मत मांडता यावे. चर्चा व्हावी आणि कार्यवाही व्हावी. सरकार लोकशाही परंपरेला बांधिल असले पाहिजे. त्या मोडण्यात, उलटवण्यातून यांना काय मिळते कुणास ठाऊक? सरकार असुरक्षित आहे आणि त्यातूनच हे घडत आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, राहुल गांधी पुतिन मुद्यावर बोलले आहेत. मला वाटते की, सरकारने त्याला उत्तर द्यावे. भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांनी सर्वांना भेटणे चांगले होईल. लोकशाहीमध्ये सगळ्यांना भेटण्याचा मोकळेपणा भारतात असला पाहिजे.
काँग्रेस खासदार कुमारी शैलजा यांनी राहुल गांधी यांच्या पुतिन यांना भेटण्याची परवानगी देण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सरकारने आपल्या लोकशाहीच्या परंपरांचा अनादर केला आहे. त्यांचा लोकशाहीवर किंवा तिच्या परंपरांवर विश्वास नाही. लोकसभेत राहुल गांधी आणि राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते आहेत. परंतु भाजपा सरकारने ही परंपरा मोडीत काढली आहे. हे देशाच्या प्रतिष्ठेसाठी चांगले लक्षण नाही.
पुतिन भेटीपूर्वी भारत-रशियामध्ये
2 अब्ज डॉलर्सचा पाणबुडी करार
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीच्या काही तास आधी भारताने रशियाकडून अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या भाड्याने घेण्यासाठी सुमारे 2 अब्ज डॉलर्स देण्याचे मान्य केले आहे. गेले दहा वर्षे या पाणबुडीच्या किमतीवरून चर्चा वारंवार थांबत होती.
या कराराच्या अटींनुसार 10 वर्षांसाठी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होईल. मात्र, सक्रिय युद्ध ऑपरेशन्समध्ये ती तैनात करता येणार नाही. भारत स्वतःच्या स्वदेशी अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या तयार करत असताना खलाशांना प्रशिक्षण देणे आणि ऑपरेशनल कौशल्य बळकट करणे, हा या पाणबुड्या घेण्यामागील हेतू आहे.
अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या डिझेल-इलेक्ट्रिक जहाजांपेक्षा खूपच प्रगत मानल्या जातात. कारण त्या जास्त काळ पाण्यात राहू शकतात, आकाराने मोठ्या असतात आणि विशेषतः हिंदी आणि पॅसिफिक महासागरांच्या विस्तृत पाण्यातून शोधणे कठीण असते. करारात देखभाल आणि लॉजिस्टिक सपोर्टचादेखील समावेश आहे. भारताने 10 वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मागील रशियन पाणबुडी 2021 मध्ये परत करण्यात आली होती.
भारताकडे सध्या 17 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात भू-राजकीय लक्ष वाढत असताना, जागतिक स्तरावर अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांमध्ये अधिक महत्त्वाच्या ठरत आहेत. जागतिक पातळीवर, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशिया हे काही देशात सध्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या तैनात आहेत. भारत शत्रूच्या पाणबुड्या आणि पृष्ठभागावरील जहाजांचा शोध घेण्यास सक्षम असलेल्या स्वदेशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या पाणबुड्या विकसित करत आहे. या व्यतिरिक्त, भारत पुढील वर्षी तिसरी आंतरखंडीय (बॅलिस्टिक) क्षेपणास्त्र पाणबुडी आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याची तयारी करत आहे, तर आणखी दोन स्वदेशी अणुऊर्जेवर चालणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या पाणबुड्यादेखील बांधत आहे.
——————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
झारखंडमध्ये ‘विषारी वायू गळती’मुळे २ जणांचा मृत्यू, काही जण रुग्णालयात
तेरे इश्क में बॉक्स ऑफिसवर करतोय तुफान राडा; १ आठवड्याच्या आत १०० कोटींचा टप्पा ओलांडला









