Election Commission on Rahul Gandhi’s Voter Fraud Allegations: काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत थेट निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीत बनावट मतदान करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर आता निवडणूक आयोगांना राहुल गांधींना पत्र पाठवत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप करताना कर्नाटकातील मतदारसंघाचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (Election Commission) राहुल गांधी यांना पत्र पाठवून, त्यांनी लोकसभा निवडणुकीत एका मतदाराने दोनदा मतदान केल्याच्या आरोपाच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.
राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सादर केलेले काही कागदपत्रे “निवडणूक आयोगाचा डेटा” असल्याचा दावा केला होता.
या पत्रात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राहुल गांधींनी शकुन राणी नावाच्या मतदाराने दोनदा मतदान केल्याचा आरोप केला. त्यांनी जे कागदपत्रे दाखवले त्यावर “पोलिंग बूथच्या अधिकाऱ्याची टिक मार्क” असल्याचा दावा केला. मात्र, चौकशीदरम्यान शकुन राणी यांनी फक्त एकदाच मतदान केल्याचे सांगितले.
तसेच, राहुल गांधींनी दाखवलेली टिक मार्क असलेली कागदपत्रे पोलिंग अधिकाऱ्याने जारी केलेली नसल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाने राहुल गांधींना या संदर्भात संबंधित कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सखोल चौकशी करता येईल.
कर्नाटकसह इतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही (CEO) राहुल गांधींना पत्र पाठवले आहे. यामध्ये राहुल गांधींना त्यांच्या आरोपांशी संबंधित मतदारांची माहिती आणि ‘रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल, 1960’ नुसार स्वाक्षरी केलेले शपथपत्र 10 दिवसांच्या आत सादर करण्यास सांगितले आहे. जेणेकरून ‘रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट, 1950’ नुसार पुढील कारवाई करता येईल.
राहुल गांधी यांचे आरोप
राहुल गांधींनी नुकतेच लोकसभा निवडणुकीत “मत चोरीचा” आरोप केला होता. त्यांनी बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघातील महादेवनपुरा विधानसभा विभागाच्या मतदार याद्या सादर करून हे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी म्हणाले होते की, या मतदारसंघात 6.5 लाख मतांपैकी एक लाखापेक्षा जास्त मते बनावट होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत तपासात 11,965 डुप्लिकेट मतदार, 40,009 बनावट पत्त्यांचे मतदार, 10,452 एकाच पत्त्यावर अनेक मतदार आणि 4,132 चुकीचे फोटो असलेले मतदार आढळले. तसेच 33,692 मतदारांनी नवीन नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म 6’ चा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.