Operation Sindoor | राहुल गांधी ते शरद पवार … ‘ऑपरेशन सिंदूर’वर राजकीय नेत्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Operation Sindoor | भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला भारतीय हवाई दलाने पाकमध्ये सुमारे 100 किलोमीटर आत घुसून अतिरेक्यांना जबर धडा शिकवला.

या मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या नागरिकांवर किंवा पाक लष्कराच्या ठिकाणांवर कोणताही हल्ला केला नाही. केवळ अतिरेक्यांच्या कॅम्प्सवर अचूक हल्ले करण्यात आले. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे आता राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भारतीय लष्कराच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

भारतीय लष्कराने पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ल्यानंतर काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सैन्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, मला आपल्या सैन्य दलाचा अभिमान आहे. जय हिंद.

शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

शरद पवारांनी देखील ट्विट करत सैन्याचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.

या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!, असे ते म्हणाले.

याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्विट करत सैन्याचे कामगिरीचे कौतुक केले आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘मी आपल्या संरक्षण दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाण्यांवर केलेल्या लक्षित हल्ल्यांचे स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला असा कठोर धडा शिकवला पाहिजे की पुन्हा कधीही दुसरा पहलगाम होऊ नये. पाकिस्तानच्या दहशतवादी संरचनेला पूर्णपणे नष्ट केले पाहिजे. जय हिंद!’ याशिवाय, इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील ट्विट करत भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे.

Share:

More Posts