Rajinikanth Gifts Gold Chain : सोन्याचे (Gold) दर गगनाला भिडले असतानाही प्रामाणिकपणाची किंमत अजूनही जिवंत आहे, याचं जिवंत उदाहरण चेन्नईतील सफाई कर्मचारी पद्मा (padmaa) यांनी घालून दिले आहे. टी-नगर परिसरात काम करत असताना पद्मा यांना बेवारस अवस्थेत एक बॅग सापडली. या बॅगमध्ये तब्बल ४५ सॉवरेन म्हणजेच सुमारे ३६० ग्रॅम सोन्याचे दागिने होते. इतक्या मोठ्या किंमतीचे सोनं समोर असूनही पद्मा यांचा प्रामाणिकपणा डगमगला नाही.
पद्मा यांनी ही बॅग स्वतःकडे न ठेवता तात्काळ आपल्या सुपरवायजरच्या मदतीने पाँडी बाजार पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी तपास करून ही बॅग मूळ मालकाकडे सुरक्षितपणे सुपूर्द केली. पद्मा यांच्या या प्रामाणिक कृतीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली.
ही घटना साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या कानावर पोहोचताच त्यांनी पद्मा यांना चेन्नईतील त्यांच्या घरी आमंत्रित केले . रजनीकांत यांनी पद्मा यांच्या प्रामाणिकपणाचं तोंडभरून कौतुक केले आणि त्यांना सोन्याची चैन देऊन सन्मानित केले. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, रजनीकांत यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Superstar #Rajinikanth personally called Padmaa and presented her with a gold chain.. ⭐ She is a frontline worker who recovered 45 sovereigns of gold jewellery lying on the road and handed it over to its owner.. 👏 pic.twitter.com/Hc26G73sj0
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) February 3, 2026
सर्वसामान्य व्यक्तींच्या चांगल्या कामाची दखल घेण्याची रजनीकांत यांची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी मदुराईतील आपल्या चाहत्या रजनी शेखर यांची भेट घेतली होती. केवळ पाच रुपयांत पराठा विकून गरिबांना अन्न देणाऱ्या शेखर यांनाही रजनीकांत यांनी सोन्याची चैन भेट दिली होती.
दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही पद्मा यांच्या प्रामाणिकतेचा गौरव करत त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.









