Rajnath Singh on Sindh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिंध प्रदेशाबद्दल एक मोठे आणि सूचक विधान केले आहे. नवी दिल्लीत सिंधी समाज संमेलनात बोलताना ते म्हणाले की, सिंध आज भारताचा भाग नसला तरी, तो आपल्या नागरी वारशाशी खोलवर जोडलेला आहे. 1947 पूर्वी अविभाजित भारताचा भाग असलेला आणि त्यानंतर पाकिस्तानात गेलेला हा प्रदेश पुन्हा भारतात परतू शकतो, असे विधान राजनाथ सिंह यांनी केले.
मे महिन्यात झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन देशांमधील संबंधांमध्ये तणाव असताना राजनाथ सिंह यांनी हे विधान केले आहे.
बदलत्या सीमा आणि अडवाणींचा संदर्भ
राजनाथ सिंह म्हणाले की, “आज सिंधची भूमी भारताचा भाग नसेल, पण नागरी दृष्ट्या सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. आणि भूभागाचा विचार केल्यास, सीमा बदलू शकतात. कोणास ठाऊक, उद्या सिंध पुन्हा भारतात परतू शकेल.”
फाळणीनंतरही सिंधी हिंदूंचा या प्रदेशाशी असलेला भावनात्मक आणि सांस्कृतिक संबंध स्पष्ट करताना त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा संदर्भ दिला. अडवाणींच्या लेखनाचा उल्लेख करत ते म्हणाले की, त्या पिढीतील अनेक सिंधी हिंदूंनी सिंधचे भारतापासून वेगळे होणे अजूनही पूर्णपणे स्वीकारलेले नाही. सिंधू नदीचे पाणी सिंधमधील हिंदू आणि अनेक मुस्लिमांनीही पवित्र मानले होते, असेही त्यांनी नमूद केले. सिंधचे लोक, आज ते कोठेही राहत असले तरी, “नेहमीच आमचे आपले असतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सीएएचे केले समर्थन आणि विरोधकांवर टीका
याच कार्यक्रमादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) योग्य असल्याचे सांगितले. शेजारील देशांमधील छळ झालेल्या अल्पसंख्याक समुदायांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा आवश्यक होता, यावर त्यांनी भर दिला.
ते म्हणाले की, सिंधी समाजासह या समुदायांना अनेक वर्षे गंभीर हिंसाचार आणि भेदभावाला सामोरे जावे लागले. मात्र, तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे चाललेल्या सरकारांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. ज्या हिंदू समुदायाला खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांचे दुःख ओळखले आणि म्हणूनच सीएए आणला गेला.
पाकिस्तानने व्यक्त केला तीव्र संताप
राजनाथ सिंह यांच्या विधानानंतर पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानाला “भ्रमित”, “विस्तारवादी” आणि “आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन” करणारे ठरवले.
पाक परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजनाथ सिंह यांचे हे विधान धोकादायक हिंदुत्व विस्तारवादी मानसिकता दर्शवते, जे स्थापित झालेल्या सीमांना आव्हान देऊ इच्छिते आणि राज्यांच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करते. पाकिस्तानने भारतीय नेत्यांना अशा प्रक्षोभक भाषणापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे, जे प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेला धोका पोहोचवू शकते.
हे देखील वाचा – फक्त 5 हजार रुपये भरा आणि घरी घेऊन जा Hero Splendor; मायलेज 70 किमी; पाहा बंपर ऑफर









