Ram Chander Jangra | भाजपचे राज्यसभा खासदार राम चंदर जांगडा (Ram Chander Jangra) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) बचावलेल्या महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. विधवा महिलांनी “आपल्या पतींचे प्राण वाचवण्याची विनंती करण्याऐवजी दहशतवाद्यांशी लढा द्यायला हवा होता,” असे विधान केल्याने यावरून वाद निर्माण झाला आहे.
देवी अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त (Devi Ahilyabai Holkar Jayanti) एका सभेत बोलताना जांडा म्हणाले, “त्या (महिला पर्यटकांनी) लढा द्यायला हवा होता. मला वाटते की त्यांनी लढायला हवे होते. यामुळे कमी जीवितहानी झाली असती. जर सर्व पर्यटक अग्निवीर असते, तर त्यांनी दहशतवाद्यांना रोखले असते, ज्यामुळे जीवितहानी कमी झाली असती. राणी अहिल्याबाईंसारखी (Queen Ahilyabai) शौर्याची भावना आपल्या बहिणींमध्ये पुन्हा जागृत करायला हवी.”
दहशतवादाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्यामुळे त्यांच्या या विधानावर जोरदार टीका होत आहे. रोहतकचे काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा (Deepender Singh Hooda) यांनी राम चंदर जांगडा यांच्या विधानांचा तीव्र निषेध केला आणि ते अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे म्हटले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी भाजप नेत्यांवर भारतीय लष्कर आणि शहीद जवानांचा वारंवार अपमान केल्याचा आरोप केला आणि हे त्यांच्या “क्षुल्लक आणि हीन मानसिकतेचे” प्रतिबिंब असल्याचे म्हटले.
एक्स (X) वर एका पोस्टमध्ये, रमेश यांनी भाजपचे राज्यसभा खासदार राम चंदर जांगडा यांच्या अलीकडील वादग्रस्त टिप्पणीचा उल्लेख केला आणि हे विधान लाजिरवाणे असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सुरक्षा त्रुटींसाठी कोणालाही जबाबदार धरण्याऐवजी, “सत्तेच्या नशेत” असलेल्या भाजपने आता शहीद आणि त्यांच्या विधवांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
विजय शाह (Vijay Shah) आणि देवडा (Devda) यांच्यासारख्या नेत्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, ज्यांनी यापूर्वी अशाच वादग्रस्त टिप्पण्या केल्या आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. “हे नवीन विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रमेश यांनी विचारले की, या टिप्पण्यांना त्यांची मूक संमती आहे, असे समजायचे का? काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींनी या टिप्पण्यांसाठी माफी मागावी आणि खासदार राम चंदर जांगरा यांना पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी केली.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप अटक न झाल्याबद्दल विचारले असता, जांगरा म्हणाले, ” जरी हल्लेखोर पकडले गेले नसतील. आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे तळ आणि सूत्रधार उद्ध्वस्त केले आहेत,”
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २२ एप्रिल रोजी २६ जणांचा बळी गेल्यानंतर एका महिन्याहून अधिक काळानंतर हे विधान आले आहे. हल्लेखोरांनी निःशस्त्र नागरिकांना लक्ष्य केले, ज्यामुळे देशभरात संताप आणि निषेध व्यक्त झाला.