Home / देश-विदेश / ‘या’ राज्यामध्ये RSS च्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी; काँग्रेस अध्यक्षांच्या पुत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

‘या’ राज्यामध्ये RSS च्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी; काँग्रेस अध्यक्षांच्या पुत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

RSS Ban in Karnataka: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) नुकतेच आपले 100 वर्षे पूर्ण केले असून, देशभरात त्याचे शताब्दी वर्ष साजरे...

By: Team Navakal
RSS Ban in Karnataka

RSS Ban in Karnataka: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) नुकतेच आपले 100 वर्षे पूर्ण केले असून, देशभरात त्याचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात भाग घेऊन संघाच्या सन्मानार्थ टपाल तिकीट आणि नाणे देखील जारी केले होते.

मात्र, याच वेळी कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने RSS च्या सर्व उपक्रमांवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

कर्नाटक सरकारमधील माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यात RSS च्या कार्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

प्रियांक खर्गे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रियांक खर्गे यांनी पत्रात गंभीर आरोप करत आरएसएस संविधानाविरुद्ध काम करत असल्याचा दावा केला आहे. देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणण्यासाठी तरुण आणि लहान मुलांना भडकावले जात असल्याचा आरोप प्रियंक खरगे यांनी केला आहे.

त्यांनी RSS च्या शाखा, बैठका, सार्वजनिक कार्यक्रम तसेच सरकारी शाळा, अनुदानित शाळा, खेळाची मैदाने आणि सरकारी नियंत्रणाखालील मंदिरांमध्ये होणाऱ्या RSS च्या कार्यक्रमांवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. RSS चे कार्यकर्ते पोलिसांच्या परवानगीशिवाय लाठी घेऊन फिरतात, ज्यामुळे समाजात द्वेषाचे बीज पेरले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

प्रियांक खरगे यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यास आणि माहिती घेऊन आवश्यक कृती करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे RSS च्या कार्यावर बंदीची टांगती तलवार असल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजपने या मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले आहे की, काँग्रेसला RSS ची वाढती लोकप्रियता सहन होत नाहीये आणि त्यांचे सरकार असहिष्णू झाले आहे. काँग्रेस सरकार आपल्या अपयशांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा नवा मुद्दा उभा करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

RSS च्या कार्यकर्त्यांनी कधीही अनुशासनहीनता दाखवल्याची एकही घटना देशात कुठेही नाही, असे स्पष्टीकरण विजयेंद्र यांनी दिले. दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेत RSS च्या प्रार्थनेतील दोन ओळी वाचून तिचे कौतुक केले होते. त्यामुळे काँग्रेसमध्येच या विषयावर मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे.

हे देखील वाचा – देशातील सर्वात स्वस्त कार! फक्त दरमहिना 4,916 रुपये भरा आणि घरी घेऊन जा गाडी

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या