Russia-Ukraine War | मागील 3 वर्षांपासून सुरू असलेले रशिया – युक्रेन युद्ध थांबवण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये याबाबत लवकरच निर्णायक तोडगा निघण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेनसोबत शांतता करारावर काम करण्यास तयार असल्याची माहिती व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी दोन तासांच्या चर्चेनंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सांगितले की, तीन वर्षांपासून सुरू असलेला युक्रेन (Ukraine) युद्ध संपवण्यासाठी रशिया तयार आहे.
पुतिन म्हणाले, “आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत सहमत झालो आहोत की रशिया संभाव्य शांतता करारावर काम करण्यास तयार आहे. त्यासाठी तत्त्वे, वेळ आणि प्रक्रिया निश्चित केली जाईल.”
पुतिन यांच्या मते, शांततेसाठी पुढे जाण्यापूर्वी युद्धविरामाची मुदत निश्चित करणे आवश्यक आहे. युक्रेनने अमेरिका आणि आपल्या युरोपीय भागीदारांना आवाहन केले आहे की त्यांनी त्वरित आणि कोणत्याही अटीशिवाय 30 दिवसांचा युद्धविराम स्वीकारावा.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण करून युद्धास सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये घडलेला हा सर्वात मोठा संघर्ष मानला जातो.
2014 मध्ये क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर, तसेच डोनबासमधील फुटीरतावादी हालचालींना पाठिंबा दिल्यानंतर रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. रशियाचा दावा आहे की ही एक “विशेष लष्करी मोहीम” असून युक्रेनचे विसैनिकीकरण (demilitarise) करणे आणि रशियन भाषिकांची रक्षा करणे हे उद्दिष्ट आहे. मात्र जागतिक स्तरावर हा हल्ला अनावश्यक आक्रमण म्हणून पाहिला जातो.
मार्च 2022 नंतर प्रथमच तुर्कीमध्ये पुन्हा सुरू झालेल्या थेट वाटाघाटींना ट्रम्प यांच्या पाठिंब्याबद्दल पुतिन यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ट्रम्प यांनी रशियाच्या शांततेबाबतच्या वचनबद्धतेची नोंद घेतली असली तरी वाटाघाटींचा मार्ग अजूनही आव्हानात्मक आहे, असे पुतिन म्हणाले.
“आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संघर्षाची मूळ कारणे दूर करणे. त्याशिवाय शाश्वत शांतता शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही युरोपीय नेत्यांना पुतिन यांच्या हेतूंवर शंका आहे. त्यांच्या मते, पुतिन आणि ट्रम्प मिळून युक्रेनवर दंडात्मक शांतता करार लादू शकतात, ज्यात युक्रेनला ना सुरक्षा हमी मिळेल ना पूर्ण भूभाग. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये शांतता करारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देश यावर सहमत झाल्यास लवकरच हे युद्ध थांबू शकते.