मॉस्को – रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने (United States)भारतावर करापोटी अतिरिक्त २५ टक्के दंड आकारण्याची घोषणा केली. त्याचवेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar)यांनी आज रशियाची राजधानी मॉस्को येथे रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह (Russian Foreign Minister Sergey Lavrov)यांची भेट घेतली. दोन्ही देशांतले संबंध दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर सर्वाधिक स्थिर आणि विश्वासार्ह राहिलेले आहेत, असे जयशंकर म्हणाले.
या भेटीनंतर ते म्हणाले, ही भागीदारी केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही, तर यामध्ये संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक (investment)आणि लोकांमधील परस्पर संबंध यांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमध्ये अनेक उच्चस्तरीय गाठीभेटी झाल्या. यामध्ये गेल्यावर्षीची २२वी वार्षिक शिखर परिषद आणि कजान येथील बैठकीचाही समावेश आहे. या बैठकांमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देण्याचे काम झाले. चालू वर्षअखेरीस होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेची तयारीही जोरात सुरू आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Advisor Ajit Doval), केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Minister Ashwini Vaishnaw)आणि निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी (NITI Aayog Vice Chairman Suman Bery) यांच्या अलीकडेच झालेल्या रशिया दौऱ्याने दोन्ही देशांतले संबंध किती दृढ आणि बहुआयामी आहेत, हेच अधोरेखित केल्याचेही जयशंकर म्हणाले. जागतिक सद्यस्थितीचा हवाला देत त्यांनी आज जग बहुध्रुवीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले. लावरोव्ह यांनीही जयशंकर यांच्यासोबतची बैठक रचनात्मक ठरली असून द्विपक्षीय भागीदारीला नवी दिशा देईल, असे म्हटले.
अमेरिकेने भारतावर २५ टक्के कर आकारण्याची घोषणा केली. त्याची अंमलजबावणीही सुरू झाली. आता अमेरिकेने २९ ऑगस्टपासून रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त २५ टक्के (additional 25% duty)कर लावण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा रशिया दौरा सुरू आहे. जयशंकर हे तीन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत.