Sadhvi Prem Baisa Death : राजस्थानच्या जोधपूरमध्ये सनातन धर्माच्या प्रचारक साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे चार तासांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक कथित पोस्ट शेअर झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र ही पोस्ट साध्वींच्या सांगण्यावरून त्यांच्या वडिलांनीच केली होती, अशी कबुली त्यांनी दिली आहे.
साध्वी प्रेम बाईसा यांना गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होत होता. त्यांच्या वडिलांच्या माहितीनुसार, उपचारासाठी आश्रमात एका कंपाउंडरला बोलावण्यात आले होते. इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच साध्वींची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधित कंपाउंडरला ताब्यात घेऊन इंजेक्शनचे आवरण, वापरलेली औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले आहे.
इंजेक्शन दिल्यानंतर साध्वींची तब्येत गंभीर झाली होती. त्यांना आश्रमातून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून, हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे कट असल्याचा आरोपही केला जात आहे.
दरम्यान, साध्वींच्या मृत्यूनंतर चार तासांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेली पोस्ट अंतिम संदेश किंवा सुसाईड नोट असल्याचे भासले. यामुळे भक्तांमध्ये आणि पोलिसांमध्येही संभ्रम निर्माण झाला. याबाबत साध्वींचे वडील वीरमनाथ यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, ही पोस्ट त्यांच्या सांगण्यावरून आणि भक्तांच्या विनंतीवरून करण्यात आली होती.
साध्वी प्रेम बाईसा या गेल्या काही काळापासून समाजमाध्यमांवर सक्रिय होत्या. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या एका पुरुषाला मिठी मारताना दिसत होत्या. या व्हिडीओनंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांनी “मी अग्निपरीक्षेस तयार आहे,” असे म्हणत समाजमाध्यमांवर भावनिक प्रतिक्रिया दिली होती.
या प्रकरणानंतर साध्वींनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत स्पष्ट केले होते की संबंधित व्हिडीओमधील व्यक्ती त्यांचे वडील असून, आईच्या निधनानंतर त्यांनीच लहानपणापासून त्यांची काळजी घेतली आणि तेच त्यांचे गुरु असल्याने त्यांनी भावनिक क्षणी त्यांना मिठी मारली होती. काही लोकांनी हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून व्हायरल केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
व्हिडीओ व्हायरल करू नये म्हणून २० लाख रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत साध्वींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस कारवाईनंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी माफी मागितल्यानंतर साध्वींनी त्याला माफ केले होते. मात्र, तो आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप साध्वींच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
साध्वींच्या भक्तांनी मृत्यूनंतरच्या घडामोडींवरही संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या आरोपानुसार, अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेह खाजगी रुग्णालयातून आश्रमात आणून एका वाहनात ठेवण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात नेण्यास वडिलांनी आणि समर्थकांनी विरोध केल्याचा आरोप आहे. तसेच आश्रमातील सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकल्याचेही सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त (पश्चिम) छबी शर्मा यांनी सांगितले की, साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, तो बालोत्रा जिल्ह्यातील परेऊ परिसरातील जस्ती गावात नेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच आश्रमाबाहेर आणि एमजीएच शवागारात मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.











