Aamby Valley : सहारा समूह (Sahara Group) लोणावळ्यातील ॲम्बी व्हॅलीसह (Aamby Valley) आपल्या विविध मालमत्ता अदानी समुहाला (Adani Group) विकणार आहे. यामध्ये लखनौमधील सहारा शहराचाही समावेश आहे. यासाठी सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशन लिमिटेडने या मालमत्ता अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) परवानगी मागितली आहे.
यासंदर्भात सहाराने वकील गौतम अवस्थी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १४ ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेद्वारे सहारा समूहाच्या मालमत्ता अदानी समूहाला विकण्याची परवानगी मागण्यात आली आहे. ही विक्री ६ सप्टेंबर २०२५ च्या ‘अट तालिके’मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार होणार आहे.
अब्धावधींची उलाढाल असलेला सहारा समूह दिवाळखोरीत सापडल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले होते. यावर सुप्रीम कोर्टाने मालमत्ता विकून गुंतवणूकदारांची परतफेड करण्याचे आदेश समुहाला दिले होते. सहारा समूहाने अनेक प्रयत्न करून आपली जंगम आणि स्थावर मालमत्ता विकली. त्यातून आतापर्यंत सुमारे १६,००० कोटी रुपये ‘सेबी-सहारा रिफंड खात्या’मध्ये जमा केले आहेत.
या याचिकेनुसार, न्यायालयाच्या आदेशांनंतरही सहारा समूहाला वेगवेगळ्या अडचणींमुळे आपल्या काही मालमत्तांची विक्री करणे शक्य होत नाही. सहारा समुहाकडे एकूण २४,०३० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. पण भांडवल बाजार नियामक संस्था असलेल्या सेबीला प्रतिष्ठित ब्रोकरेज कंपन्यांना नेमूणही करूनही मालमत्ता विकण्यात पुरेसे यश आले नाही. विक्रीतून केवळ १६ हजार कोटी रक्कमच जमा झाली आहे. त्यामुळे आता सेबी-सहारा रिफंड खात्यात उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी उर्वरित मालमत्ता विकणे आवश्यक आहे. त्यासाठी अदानी समूहासोबतच्या या प्रस्तावित विक्री कराराला मान्यता द्यावी, अशी मागणी सहारा समुहाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.
हे देखील वाचा–