Shashi Tharoor | पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी विविध देशात शिष्टमंडळे पाठवले आहेत. नुकतेच, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमेरिकेला भेट देत भारताची भूमिका मांडली.
अमेरिकेत बोलताना शशी थरूर यांनी दहशतवादाविरोधात जगाने एकत्र येण्याचे आवाहन केले. भारतीय वाणिज्य दूतावासात बोलताना थरूर म्हणाले, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने 9/11 स्मारकालादिलेली भेट ही त्यांची पहिली भेट होती.
ते म्हणाले, “ही आमच्यासाठी अत्यंत भावनिक बाब होती, पण आमच्या देशात झालेल्या आणखी एका दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही या शहरात आलो आहोत, ज्या शहरावर त्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे अजूनही व्रण आहेत, हे सांगण्याचा आमचा उद्देश होता.” थरूर पुढे म्हणाले, “आम्ही येथे आलो आहोत, ही एक सामायिक समस्या आहे, याची आठवण करून देण्यासाठी, तसेच पीडितांसोबत एकजूट दाखवण्यासाठी… ही एक जागतिक समस्या आहे, ती एक कीड आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन तिचा सामना केला पाहिजे.”
सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीच्या उद्देशाविषयी बोलताना थरूर म्हणाले, “आम्ही ज्या देशांना भेट देणार आहोत, त्या प्रत्येक देशातील सार्वजनिक आणि राजकीय मतांच्या लोकांसोबत नुकत्याच घडलेल्या घटनांबद्दल बोलणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. या घटनांमुळे जगभरातील अनेक लोक चिंतेत आहेत. या घटनेचे मूळ कारण अजूनही कायम आहे आणि आमची विचारसरणी आणि चिंता लोकांना समजावून सांगणे महत्त्वाचे आहे.”
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे वर्णन करताना थरूर म्हणाले, “काही लोक फिरत होते आणि समोरच्या लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या करत होते, ज्यामुळे भारतातील उर्वरित लोकांमध्ये प्रतिक्रिया निर्माण करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू होता, कारण पीडित बहुतांश हिंदू होते.”
जम्मू आणि काश्मीरमध्ये राजकारण्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्व लोक कशा प्रकारे एकत्र आले, याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. “धार्मिक आणि इतर मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात एकजूट दिसून आली. या हल्ल्यामागे वाईट हेतू होता, हे स्पष्ट आहे… भारत दुर्दैवाने या हल्ल्याचा स्त्रोत ओळखण्यात चुकला नाही.”
अधिक माहिती देताना थरूर म्हणाले, “या हल्ल्याच्या एका तासाच्या आत, रेझिस्टन्स फ्रंट (नावाच्या गटाने याची जबाबदारी स्वीकारली. रेझिस्टन्स फ्रंट हा लष्कर-ए-तैयबाचा गट आहे. ज्याला अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी घोषित केले आहे. भारताने 2023 आणि 2024 मध्ये रेझिस्टन्स फ्रंटबद्दलची माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिली होती आणि दुर्दैवाने, 2025मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आणि दुसऱ्या दिवशी जबाबदारी स्वीकारली.”
यावेळी थरूर यांना मोदी सरकारसाठी काम करता का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, “तुम्हाला माहीत आहे की, मी सरकारसाठी काम करत नाही. मी विरोधी पक्षात काम करतो, पण मी स्वतः भारतातील एका वृत्तपत्रात दोन दिवसांत एक लेख लिहिला होता आणि म्हटले होते की, आता कठोर आणि योग्य कारवाई करण्याची वेळ आली आहे आणि मला आनंद आहे की भारताने नेमके तेच केले.”
दरम्यान, थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळात शंभवी चौधरी (लोक जनशक्ती पार्टी), सरफराज अहमद (झारखंड मुक्ती मोर्चा), जी. एम. हरीश बालायोगी (तेलगू देसम पार्टी), शशांक मणी त्रिपाठी, तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर के. लता (सर्व भाजप), मल्लिकार्जुन देवडा (शिवसेना) आणि अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरणजीत सिंग संधू यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ दहशतवादाच्या विरोधात भारताची राष्ट्रीय सहमती आणि ठाम भूमिका जगासमोर मांडणार आहे.