Pakistan Blast : पाकिस्तानमधील इस्लामाबाद न्यायालयाबाहेर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी थेट भारतावर आरोप केले आहेत. त्यांनी अफगाणिस्तान सीमेजवळील वाना येथील कॅडेट कॉलेजवर झालेल्या हल्ल्यामागेही भारताचा हात असल्याचा दावा केला आहे.
रिपोर्टनुसार, शरीफ यांनी या दोन हल्ल्यांसाठी “भारतीय-प्रायोजित दहशतवादी प्रतिनिधींना” जबाबदार धरले आहे. “हे हल्ले भारताच्या राज्य-प्रायोजित दहशतवादाचाएक भाग आहेत, ज्याचा उद्देश पाकिस्तानला अस्थिर करणे आहे,” असे विधान त्यांनी म्हटले आहे.
भारताचे सडेतोड उत्तर
कोणत्याही पुराव्याशिवाय हल्ल्याच्या काही तासांतच शेहबाज शरीफ यांनी केलेले हे निराधार आरोप भारताने तात्काळ आणि स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) यावर कडक प्रतिक्रिया दिली.
MEA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे: “भारत एका अत्यंत भ्रमित पाकिस्तानी नेतृत्वाने केलेल्या बिनबुडाच्या आणि निराधार आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावतो. आपल्या देशातील चालू असलेल्या लष्करी-प्रेरित घटनात्मक विध्वंस आणि सत्ता हस्तगत करण्याच्या प्रक्रियेपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानकडून भारताविरुद्ध खोटे कथन तयार करणे ही नेहमीचीच रणनीती आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला हे सत्य चांगलेच माहीत आहे आणि पाकिस्तानच्या या निराशाजनक डावपेचांना ते फसणार नाहीत.”
दहशतवादाचा केंद्रबिंदू
दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे, पण जेव्हा हेच दहशतवादी त्यांच्यासाठी धोकादायक ठरतात , तेव्हा ते दोष भारतावर टाकतात. पाकिस्तानने वारंवार तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या हल्ल्यांना अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीशी जोडून, त्याला “भारताची कठपुतळी” म्हटले आहे.
पाक संरक्षण मंत्र्यांची ‘युद्धाची’ भूमिका
दरम्यान, घटनेच्याआधीच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खवाजा आसिफ यांनी देशात “युद्धाची परिस्थिती” असल्याचे म्हटले होते. इस्लामाबादच्या जिल्हा न्यायिक संकुलाजवळ झालेला आत्मघाती बॉम्बस्फोट ही राष्ट्रासाठी ‘जागृत करणारी घंटा’ असल्याचे त्यांनी नमूद केले.
खवाजा आसिफ यांनी बॉम्बस्फोटासाठी थेट अफगाणिस्तानच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आणि इशारा दिला की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील हे ‘युद्ध’ आता केवळ ड्युरँड लाइन (सीमा प्रदेश) पर्यंत मर्यादित राहिलेले नाही.
हे देखील वाचा – BMC Wards : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू ! प्रभाग निश्चित









