Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भारतात आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एक ऑडिओ संदेश जारी करत मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
ऑगस्ट २०२४ मध्ये सत्ता सोडल्यानंतर शेख हसीना यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या जनतेला उद्देशून भाषण केले असून, युनूस सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन केले आहे.
युनूस सरकारवर कडक शब्दात टीका
शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांचे वर्णन ‘सत्तापिपासू आणि भ्रष्ट गद्दार’ असे केले आहे. आपल्या सरकारविरुद्ध कट रचून परकीय शक्तींच्या मदतीने त्यांनी सत्ता बळकावल्याचा आरोप हसीना यांनी केला. युनूस यांच्या छायेखाली बांगलादेशमध्ये कधीही मुक्त आणि न्याय्य निवडणुका होऊ शकत नाहीत, असा दावा करत त्यांनी जनतेला लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
हसीना यांच्या मुख्य ५ मागण्या
आवामी लीगच्या वतीने शेख हसीना यांनी ५ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
- बेकायदेशीर युनूस प्रशासन हटवून पुन्हा लोकशाहीची स्थापना करणे.
- हिंसाचार आणि अराजकता थांबवून देशाची अर्थव्यवस्था स्थिर करणे.
- धार्मिक अल्पसंख्याक, महिला आणि समाजातील असुरक्षित घटकांच्या सुरक्षिततेची हमी देणे.
- आवामी लीगच्या नेत्यांवर आणि पत्रकारांवर सुरू असलेली राजकीय सूडबुद्धीची कारवाई थांबवणे.
- गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांची संयुक्त राष्ट्रांमार्फत निपक्षपाती चौकशी करणे.
लोकशाही हद्दपार झाल्याचा आरोप
आपल्या संदेशात हसीना यांनी बांगलादेशमधील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, सध्या बांगलादेशमध्ये लोकशाही हद्दपार झाली असून मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे. माध्यमांची गळचेपी केली जात असून महिलांवरील अत्याचार आणि अल्पसंख्याकांचा छळ वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून देश दहशतीच्या छायेखाली वावरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आगामी निवडणुकीचे चित्र
बांगलादेशमधील आगामी निवडणुकीत आवामी लीगला निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेख हसीना यांच्या या प्रक्षोभक भाषणामुळे बांगलादेशमधील अंतरिम सरकार आणि भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारने हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असली, तरी भारताने अद्याप त्यावर कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही.









