Home / देश-विदेश / Vande Mataram : राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम गायचे! नवा नियम ! मुस्लिमांचा विरोध डावलून सर्व सहा कडवी बंधनकारक

Vande Mataram : राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम गायचे! नवा नियम ! मुस्लिमांचा विरोध डावलून सर्व सहा कडवी बंधनकारक

Vande Mataram : केंद्रातील मोदी सरकारने सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीत ‘जन गण मन’ म्हणण्यापूर्वी ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) म्हणायचे असा...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 
Vande Mataram : केंद्रातील मोदी सरकारने सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीत ‘जन गण मन’ म्हणण्यापूर्वी ‘वंदे मातरम’
(Vande Mataram) म्हणायचे असा  नवा नियम आज जाहीर केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, आता राष्ट्रगीतापूर्वी  वंदे मातरम गायले जाईल आणि ते गाताना केवळ त्याची पहिली दोन कडवी न गाता पूर्ण सहा कडवी म्हणणे बंधनकारक आहे. या गीताचे संपूर्ण सादरीकरण 3 मिनिटे 10 सेकंदांचे असेल. हे गाताना  सर्व नागरिकांनी उभे राहणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


नव्या नियमांनुसार जर राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि  ‘वंदे मातरम’ एकाच कार्यक्रमात सादर करायचे असतील तर ‘वंदे मातरम’ला  प्राधान्य देण्यात येईल आणि ते प्रथम गायले जाईल. विशेष राज्य सोहळे, राष्ट्रपती व राज्यपाल उपस्थित असलेले कार्यक्रम, महत्त्वाचे औपचारिक समारंभ यात हे नियम लागू असतील. ‘वंदे मातरम’ याची सहा कडवी असलेली आवृत्ती 3 मिनिटे 10 सेकंदांची असून, राष्ट्रगीत ‘जन गण मन’ हे 52 सेकंदांचे आहे. त्यामुळे विशेष कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’चा कालावधी राष्ट्रगीतापेक्षा अधिक असेल. पद्म पुरस्कारांसारखे नागरी सन्मान सोहळे, राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम तसेच राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार्‍या सर्व अधिकृत समारंभांमध्ये ‘वंदे मातरम’ अनिवार्य असेल. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर आणि प्रस्थानापूर्वी ‘वंदे मातरम’ वाजवले जाईल. झेंडा वंदन, राष्ट्रपती व राज्यपालांची भाषणे तसेच राष्ट्राला उद्देशून होणार्‍या संबोधनांपूर्वी आणि नंतरही हे गीत सादर करण्यात येईल.


यापूर्वी शाळेत किंवा इतर कार्यक्रमात, संघाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ची केवळ दोन कडवी गायली जात होती, ज्यासाठी सुमारे 65 सेकंदांचा वेळ लागत होता. मात्र, नव्या नियमावलीनुसार आता सहा कडवी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नवे नियम सर्व सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, सरकारी शाळांमधील समारंभ तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारितील सर्व कार्यक्रमांना लागू असतील. शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींना आवश्यक ती सवलत देण्यात येईल. मात्र सामान्य नागरिकांनी या नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण गीत असलेल्या ‘वंदे मातरम’ला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण झाली. हे गीत बंगालचे प्रसिद्ध कवी बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आणि त्याला रवींद्रनाथ टागोर यांनी चाल दिली. त्या पार्श्वभूमीवर देशभर विविध उपक्रम राबवण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, 2025 च्या अखेरीस झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘वंदे मातरम’ विषयावर चर्चा झाली होती. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुद्दाम हा विषय पुढे आणल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

मुस्लिमांनी विरोध का केला?
वंदे मातरम हे राष्ट्र गान म्हणून स्वीकारण्याचा निर्णय 1937 साली भारतीय काँग्रेसने घेतला. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद आदि काँग्रेस नेत्यांच्या कार्यकारिणीत हा निर्णय झाला. मात्र तेव्हा ‘वंदे मातरम’ची पहिली दोनच कडवी घ्यायचे सर्वानुमते ठरले. याचे कारण या गीताच्या पुढील कडव्यांना मुस्लिमांचा विरोध होता. पुढील कडव्यांमध्ये हिंदू देवतांचा उल्लेख आहे. आम्ही फक्त अल्लाह यांना मानतो, त्यामुळे पुढील कडवी आम्हाला मान्य नाहीत, असा पवित्रा मुस्लिमांनी घेतला. त्यानंतर धार्मिक तेढ वाढू नये म्हणून पूर्ण सहा कडवी न घेता फक्त पहिली दोन कडवी घेण्याचा निर्णय झाला होता. आज मात्र नवीन नियमानुसार ‘वंदे मातरम’ गीताची सर्व सहा कडवी गायली जाणार आहेत.

—————————————————————————————————————————–

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या