Covid-19 wave hits Asia | आग्नेय आशियातील देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. हाँगकाँग (Hong Kong) आणि सिंगापूरमध्ये (Singapore) रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाली असून, चीन (China) आणि थायलंडमध्ये (Thailand) देखील संक्रमण दर वाढत आहे.
सिंगापूरमध्ये 3 मेपर्यंत 14,200 रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या वर्षभरात ही संख्या तब्बल 28% ने वाढली आहे., आशियामध्ये कोविड-19 च्या नव्या लाटेमुळे ही वाढ झाल्याचे दिसते.
सिंगापूरमध्ये LF.7 आणि NB.1.8 व्हेरियंट्समुळे रुग्णसंख्या वाढली
सध्या सिंगापूरमध्ये LF.7 आणि NB.1.8 हे व्हेरियंट्स प्रामुख्याने आढळत आहेत. हे दोन्ही JN.1 स्ट्रेनशी संबंधित असून, सुमारे दोन-तृतीयांश संक्रमित प्रकरणांमागे हेच व्हेरियंट्स जबाबदार आहेत, असे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोणत्या लोकांना अधिक धोका?
कमी प्रतिकारशक्ती (Immunity) असलेल्या किंवा पूर्वीपासून आजारी असलेल्या लोकांना या लाटेचा धोका अधिक आहे. डॉक्टरांच्या मते, सध्या हवामानामुळे प्रतिकारशक्ती घटते आहे. त्यामुळे सिंगापूरमध्ये नागरिकांना बूस्टर डोस (Booster Doses) घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानुसार नव्या व्हेरियंट्समुळे गंभीर रुग्णसंख्या वाढत असल्याचा कोणताही पुरावा नाही. सध्या रुग्णांवर सामान्य फ्लूप्रमाणे उपचार केले जात आहेत आणि बहुतेक प्रकरणे काहीही गुंतागुंत न होता बरी होत आहेत.
चीन, थायलंडमध्येही संसर्ग दरात वाढ
चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या आकडेवारीनुसार, 4 मे पर्यंतच्या 5 आठवड्यांमध्ये रुग्णालयांतील पॉझिटिव्हिटी दर दुप्पट झाला आहे. थायलंडमध्ये सोंगक्रान महोत्सवानंतर दोन ठिकाणी रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
नवीन लाटेचा भारताला किती धोका?
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Health and Family Welfare) आकडेवारीनुसार, भारतात सध्या केवळ 93 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. अद्याप देशात नव्या लाटेची कोणतीही नोंद झालेली नाही. तरीही आरोग्य यंत्रणा सतर्क असून, लसीकरण अद्ययावत ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.