Sonam Wangchuk: प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहिले आहे. लडाखमधील आंदोलने आणि पतीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर लडाखच्या जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या आदिवासी पार्श्वभूमीचा आधार घेत त्यांनी आवाहन केले आहे.
हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवण्यात आले आहे. गीतांजली अँगमो यांनी पत्रात म्हटले आहे की, हवामान बदल आणि मागासलेल्या आदिवासी भागाच्या विकासासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या ‘गांधीवादी आंदोलक’ सोनम वांगचूक यांची ‘बिनशर्त सुटका’ करावी.
कडक NSA कायद्याखाली अटक
लडाखला सहाव्या अनुसूचीचेसंरक्षण आणि राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर वांगचूक यांना गेल्या आठवड्यात लेह येथे अटक करण्यात आली. त्यांच्यावर कडक राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जोधपूर सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले आहे.
गीतांजली अँगमो यांनी ही अटक योग्य नसल्याचे म्हटले आहे. 26 सप्टेंबर रोजी लेह येथील इन्स्पेक्टर रिग्झिन गुरमेट यांनी आपल्याला सांगितले की, वांगचूक यांना NSA च्या कलम ३(२) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून त्यांना जोधपूर सेंट्रल जेलमध्ये हलवले जात आहे, अशी माहिती अँगमो यांनी दिली.
‘अटकेनंतर एकदाही बोलणे झाले नाही’
वांगचूक यांना जोधपूरला घेऊन जाणारे ASP ऋषभ शुक्ला यांनी लँडिंगनंतर पतीशी बोलणे करून देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत त्यांचे बोलणे झाले नाही, असे अँगमो यांनी सांगितले. “त्या अधिकाऱ्याने मला सांगितले होते की ही FIR आधारित अटक नाही, तर NSA अंतर्गत फक्त ताब्यात घेणे आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच, आपले कायदेशीर हक्कसमजावून सांगण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही, असा त्यांचा दावा आहे.
वांगचूक यांच्या पत्नीचा दावा आहे की, त्यांच्या ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज’ या संस्थेच्या फ्यांग गावात त्यांच्यावर CRPF ची पाळत ठेवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
अँगमो यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, वांगचूक यांना ताब्यात घेताना त्यांना त्यांचे कपडे घेण्याची परवानगी मिळाली नाही. १५ दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती कमजोर झाली आहे. त्यामुळे त्यांना रोज आवश्यक असणारी औषधे आणि मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत की नाहीत, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही.
‘शांतताप्रिय गांधीवादी आंदोलक’
राष्ट्रपतींना प्रश्न विचारत त्या म्हणाल्या, “हवामान बदल, वितळणारे हिमनदी, शैक्षणिक सुधारणा आणि तळागाळातील नवकल्पना याबद्दल बोलणे हा गुन्हा आहे का? पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक असलेल्या मागासलेल्या आदिवासी भागाच्या उन्नतीसाठी गेल्या चार वर्षांपासून शांततापूर्ण गांधीवादी मार्गाने आवाज उठवणे, याला राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणता येईल का?”
‘तुम्ही आदिवासी समुदायाच्या असल्याने…’
“आदिवासी समुदायाच्या पार्श्वभूमीतून आलेल्या राष्ट्रपती म्हणून, लडाखच्या जनतेच्या भावना तुम्ही कोणापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
अखेरीस, अँगमो यांनी राष्ट्रपतींना हस्तक्षेप करून सोनम वांगचूक यांची ‘बिनशर्त सुटका’ करण्याची मागणी केली.
हे देखील वाचा – ‘ओला दुष्काळ’च्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; फडणवीसांचे 2020 चे थेट पत्रच दाखवले