Starlink Price India | भारतातील दुर्गम भागांपर्यंत जलद आणि स्थिर इंटरनेट पोहोचवण्यासाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेसएक्स (SpaceX) कंपनीच्या स्टारलिंक (Starlink) प्रकल्पाला भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडूनअधिकृत परवाना मिळाला आहे.
स्टारलिंक लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट (Satellite Internet) सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर देशातील इंटरनेट क्रांतीला मोठा बळकटी मिळणार आहे.
स्टारलिंक ही भारतात सेटेलाइट आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी परवाना मिळवणारी तिसरी कंपनी ठरली आहे. याआधी युटेलसॅट वनवेब आणि जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्स या दोन कंपन्यांना परवाना मिळाला होता. मात्र अॅमेझॉनची कुपर ही अजूनही मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे.
कधी सुरू होणार सेवा? कायदेशीर अटी काय?
रिपोर्टनुसार, स्टारलिंकला परवाना मिळाल्यानंतर पुढील 15–20 दिवसांत चाचणीसाठी आवश्यक स्पेक्ट्रम (Trial Spectrum) दिला जाईल. याआधी कंपनीला कायदेशीर इंटरसेप्शन आणि इतर सर्व सुरक्षा अटींचं पालन करावं लागेल. ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LoI) मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत हा परवाना मिळाल्याचंही समोर आलं आहे.
स्टारलिंक ही स्पेसएक्सच्या लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रहांवर आधारित आहे. हे उपग्रह केवळ 550 किमी उंचीवर असल्याने कमी लेटेंसी आणि उच्च स्पीड मिळतो. सध्या 7,000 पेक्षा अधिक उपग्रह कार्यरत आहेत आणि भविष्यात त्यांची संख्या 40,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. त्यामुळे ग्रामीण भागांमध्येही व्हिडिओ कॉल्स, ऑनलाइन गेमिंग, आणि स्ट्रीमिंगसारख्या सेवा सहज शक्य होणार आहेत.
भारतात आपली सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी स्टारलिंकने रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या प्रमुख कंपन्यांशी करार केले आहेत. या दोन्ही कंपन्यांचं मिळून 70% पेक्षा जास्त मार्केट शेअर असल्यामुळे, स्टारलिंकला जलद गतीने ग्राहकांपर्यंत पोहोचता येणार आहे.
दूरसंचार विभागानं उपग्रह सेवा कंपन्यांसाठी कठोर सुरक्षा अटी लागू केल्या आहेत. यामध्ये किमान 20% ग्राउंड नेटवर्क भारतातच उभारणं, गेटवे आणि हब भारतात असणं, आणि ग्राहकांच्या डेटावर संपूर्ण नियंत्रण असणं आवश्यक आहे. TRAI च्या शिफारशीनुसार, कंपन्यांना त्यांच्या वार्षिक महसुलाच्या (AGR) 4% इतकं शुल्क स्पेक्ट्रम वापरासाठी द्यावं लागेल. तसेच, शहरी ग्राहकांडून 500 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे.
भारतात किती असेल स्टारलिंकची किंमत?
स्टारलिंक भारतात सुरुवातीला 700 Mbps पर्यंत गती देणारी सेवा देण्याची शक्यता आहे. या सेवेसाठी दरमहा ₹840 ते ₹7,000 दरम्यान शुल्क आकारलं जाऊ शकतं. हार्डवेअर किटसाठी ₹30,000 ते ₹51,000 खर्च येण्याची शक्यता आहे, मात्र ही रक्कम ग्राहकांवर पूर्णपणे लादली जाणार नाही.