Home / देश-विदेश / Subhashchandra Bose : सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात कधी? कन्येने कोर्टात यावे

Subhashchandra Bose : सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात कधी? कन्येने कोर्टात यावे

Subhashchandra Bose : आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी जपानमधील एका मंदिरात आहेत....

By: Team Navakal
Subhashchandra Bose
Social + WhatsApp CTA

Subhashchandra Bose : आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी जपानमधील एका मंदिरात आहेत. त्यांच्यावर अंतिम विधी करण्यासाठी या अस्थी भारतात आणाव्यात, अशी मागणी करणारी याचिका बोस यांच्या एका नातेवाईकाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. आज या याचिकेच्या सुनावणीदरम्यान बोस यांची कन्या अनिता बोस फाफ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या. मात्र त्या या प्रकरणात त्या याचिकाकर्त्या नसल्याने, त्यांनी स्वतः याचिका दाखल केल्याशिवाय न्यायालय हा मुद्दा ऐकू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.


ही याचिका बोस यांचे नातलग आणि पत्रकार आशिष रे यांनी दाखल केली होती. त्यांनी केंद्र सरकारने टोकियोतील मंदिरात ठेवलेल्या अस्थी भारतात आणण्याबाबत निर्णय न घेतल्याबद्दल आक्षेप घेत त्या भारतात आणल्यास बोस यांच्या कन्येला भारतात त्यांचे अंतिम विधी करता येतील, असा मुद्दा मांडला होता. या प्रकरणावर सुनावणी करणार्‍या खंडपीठात भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्य कांत,  न्या. जयमल्ल्या बागची आणि न्या. विपुल पांचोली  यांचा समावेश होता. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांनी म्हटले की, नेताजींविषयी न्यायालयाला अत्यंत आदर आहे, परंतु या मुदद्यावर  यापूर्वीही अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. हा मुद्दा किती वेळा न्यायालयात येणार? ते आपल्या देशाचे महान नेते होते. आम्ही त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला नमन करतो. पण किती कुटुंबीय याचिका दाखल करणार? बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याबाबत निर्णय हवा असेल तर त्यांची एकमेव वारसदार असलेल्या मुलीनेच पुढे येऊन याचिका दाखल करावी.


यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, बोस यांची मुलगीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीत सहभागी झाली असून, त्यांनी याचिकेला पाठिंबा दिला आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, बोस यांच्या कन्येने स्वतः याचिका दाखल केली  तर न्यायालय त्या याचिकेवर अधिक गांभीर्याने विचार करू शकेल. न्या. बागची म्हणाले की, वारसदाराने स्वतः न्यायालयात येऊन ही मागणी करावी. आम्ही त्यांच्या भावना मान्य करतो आणि त्या भावनांना कायदेशीर स्वरूप देण्याची खात्री देतो. यानंतर याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली आणि भविष्यात पुन्हा न्यायालयात येण्याची मुभा मागितली. न्यायालयाने त्यास मान्यता दिली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ऑगस्ट 1945 मध्ये तैहोकू (सध्याचे तैपेई) येथे झालेल्या विमान अपघातात झाला, असे मानले जाते. त्या अपघातानंतर त्यांच्या अस्थी जपानमधील टोकियो येथे असलेल्या रेन्को-जी मंदिरात तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आल्या. मात्र त्या अस्थी आजपर्यंत तिथेच जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.


याचिकेत म्हटले आहे की, नेताजींच्या अस्थी काही महिन्यांसाठी ठेवण्याचा उद्देश होता. परंतु त्या 80 वर्षांहून अधिक काळ तिथेच आहेत. अनेक चौकशी आयोगांनी रेंकोजी मंदिरात जतन केलेल्या अस्थी या नेताजींच्याच असल्याचे मान्य केले आहे. तसेच अनिता बोस यांनी वारंवार त्या अस्थी भारतात आणून नेताजींचे अंतिम संस्कार सन्मानाने करण्याची मागणी केली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या