Sukhoi 30 MKI Missing: भारतीय हवाई दलाचे अत्यंत शक्तिशाली मानले जाणारे ‘सुखोई ३० एमकेआय’ (Su-30 MKI) हे लढाऊ विमान रडार संपर्कातून गायब झाले आहे. जोरहाट हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
नेमकी घटना काय?
भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, या लढाऊ विमानाने आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केले होते. रात्री ७:४२ मिनिटांनी या विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता, त्यानंतर हे विमान रडारवरून दिसेनासे झाले. विमान नेमके कुठे आहे, याचा शोध घेण्यासाठी तातडीने ‘सर्च अँड रेस्क्यू’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती येणे बाकी असून हवाई दल विमानाचा ठावठिकाणा लावण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.
हवाई दलाचा कणा: सुखोई ३० एमकेआय
सुखोई ३० एमकेआय हे विमान भारतीय हवाई दलाचा मुख्य कणा मानले जाते. १९८० च्या दशकात रशियाने विकसित केलेल्या या विमानाची विशेष आवृत्ती भारत वापरतो. भारताकडे सध्या २६० पेक्षा जास्त सुखोई विमानांचा ताफा असून ईशान्य भारतात या विमानांच्या अनेक तुकड्या तैनात आहेत. सध्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे भारतातच या विमानांची निर्मिती केली जाते.
यापूर्वीच्या दुर्घटना
सुखोई विमानांबाबत यापूर्वीही काही दुर्घटना घडल्या आहेत. जून २०२४ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक सुखोई विमान कोसळले होते. तसेच जानेवारी २०२३ मध्ये ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतरही एका विमानाचा अपघात झाला होता. आता आसाममध्ये विमान बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून डोंगरदऱ्यांमध्ये शोधकार्य राबवले जात आहे.
हे देखील वाचा – New Governor of Maharashtra: महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल! कोण आहेत जिष्णू देव वर्मा? जाणून घ्या










