Ahmadabad Plane crash | अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात 250 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या केरळच्या नर्स रणजिता गोपाकुमारन नायर यांच्याबद्दल अपमानकारक आणि जातीयवादी टिप्पणी केल्याने एका सरकारी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
केरळच्या वेल्लारिक्कुंडू तालुका कार्यालयात कनिष्ठ अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पवित्रन यांनी मृत नर्स रणजिता यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर कासारगोडचे जिल्हाधिकारी के. इनबासेकर यांनी त्यांना निलंबित केले आहे. पवित्रन यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारसही जिल्हाधिकाऱ्यांनी केरळ सरकारकडे केली आहे.
पवित्रन यांच्या टिप्पणीमुळे महिलांचा अपमान झाल्याचा ठपका ठेवत त्यांनी महसूल विभागाची बदनामी केल्याचे निलंबन आदेशात नमूद आहे. सोशल मीडियावर प्रचंड टीकेनंतर पवित्रन यांनी ती पोस्ट हटवली, मात्र सार्वजनिक मागणीनंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वीही पवित्रन यांना आमदार ई. चंद्रशेखर यांच्याविरुद्ध जातीयवादी टिप्पणी केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांनी विमान अपघात मृत्यू झालेल्या महिलेविरुद्ध जातीयवादी व अपमानकारक टिप्पणी केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या रणजिता (वय 42) केरळच्या रहिवासी होत्या. त्या यूकेमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या आणि केरळच्या आरोग्य सेवा संचालनालयातही त्यांना नोकरी मिळाली होती. यूकेतील करार पूर्ण करून त्या केरळला परतण्याच्या तयारीत होत्या. रविवारी त्या घराच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी केरळला आल्या होत्या. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात त्या प्रवास करत होत्या.