Tamil Nadu Custodial Death Case : २०२० मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूतील ‘कस्टोडियल डेथ’ (पोलीस कोठडीतील मृत्यू) प्रकरणात अखेर मोठा निकाल लागला आहे. ५८ वर्षीय पी. जयराज आणि त्यांचा ३८ वर्षीय मुलगा बेनिक्स यांच्या मृत्यूला जबाबदार धरत न्यायालयाने ९ पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या शुल्लक कारणावरून या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता.
काय होते हे संपूर्ण प्रकरण?
कोविड-१९ महामारीच्या काळात लागू असलेल्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून आपली मोबाईल शॉप उघडी ठेवल्याचा आरोप या बाप-लेकावर होता. तमिळनाडू पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि कोठडीत त्यांच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. एकमेकांसमोर त्यांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीशांनी सोमवारी हा निकाल दिला. हा सत्तेचा आणि अधिकाराचा स्पष्ट गैरवापर असल्याचे ताशेरेही कोर्टाने ओढले आहेत.
न्यायालयाने काय म्हटले?
गेल्या महिन्यातच या अधिकाऱ्यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. “त्यांनी केवळ मारहाण केली नाही, तर हत्येच्या उद्देशानेच हे कृत्य केले,” असे न्यायाधीश म्हणाले. आरोपींनी निःशस्त्र लोकांवर हल्ला केला आहे, त्यामुळे त्यांचे वय किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना कमी शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. या प्रकरणात एकूण १० पोलिसांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यातील एकाचा २०२० मध्येच कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
देशभरात उमटले होते संतप्त पडसाद
या घटनेनंतर तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. राजकीय नेत्यांपासून ते क्रिकेटपटू शिखर धवनपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर या बाप-लेकाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. या घटनेने भारतातील पोलीस यंत्रणेतील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, दरवर्षी भारतात कोठडीत शेकडो मृत्यू होतात, जे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेत मोठ्या सुधारणांची गरज आहे.
दोषी ठरवण्यात आलेल्या या ९ अधिकाऱ्यांना आता या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी उपलब्ध असेल.










