Tariq Rahman: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे अध्यक्ष तारिक रहमान (Tariq Rahman) यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भारतासह (India) १३ देशांतील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
१३ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार
शपथविधी समारंभासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अधिकृत आमंत्रण देण्यात आले आहे. आमंत्रित देशांमध्ये भारत, चीन, सौदी अरेबिया, तुर्की, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांचा समावेश आहे. हा शपथविधी सोहळा ढाक्यातील राष्ट्रीय संसद भवनाच्या दक्षिण प्लाझा येथे होणार आहे. शपथविधीपूर्वी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी या १३ देशांतील नेत्यांना अधिकृत निमंत्रण पाठवले आहे.
पंतप्रधानपदाची शपथ घेणार तारिक रहमान
२०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बीएनपीने दणदणीत विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. पक्षाध्यक्ष तारिक रहमान हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. निवडणूक विजयानंतर जनतेला संबोधित करताना त्यांनी देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. देश सुरक्षित, लोकशाही मूल्यांवर आधारित आणि मानवाधिकारांचा सन्मान करणारा असावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. “हा विजय जनतेचा विजय आहे, असे म्हणत देश पुन्हा उभा करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे रहमान यांनी सांगितले.
बीएनपीचा ऐतिहासिक विजय
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका या २०२४ मधील जनआंदोलनानंतर झालेल्या पहिल्या निवडणुका ठरल्या. या आंदोलनानंतर दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शेख हसीना यांना पद सोडावे लागले होते. ३०० सदस्यीय संसदेत सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या १५१ पेक्षा अधिक जागा बीएनपीने जिंकल्या आहेत. जमात-ए-इस्लामी आघाडी ही मुख्य विरोधी पक्ष म्हणून उदयास आली आहे. या निवडणुकीत सुमारे ५९ टक्के मतदान झाले असून प्रशासनिक सुधारणांसाठीची घटनात्मक जनमत चाचणीही मंजूर झाली आहे.
तारिक रहमान कोण?
तारिक रहमान, ज्यांना तारिक जिया म्हणूनही ओळखले जाते, हे बांगलादेशच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. ते माजी राष्ट्राध्यक्ष जियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र आहेत.
१९६७ मध्ये जन्मलेले तारिक रहमान १९७१ च्या मुक्ती संग्रामावेळी केवळ चार वर्षांचे होते. त्या काळात त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळे बीएनपीकडून त्यांना मुक्ती संग्रामातील सर्वात कमी वयाचा बंदिवान मानले जाते. वडिलांच्या हत्येनंतर ते आईच्या छत्रछायेत मोठे झाले. पुढे खालिदा जिया बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.
तारिक रहमान यांनी ढाका विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. २००७ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना अटक झाली. सुटकेनंतर ते २००८ पासून लंडनमध्ये वास्तव्यास होते.
आता झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने विजय मिळवल्याने तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार आहेत.










