Tauqeer Nizami : एआयएमआयएमचे नेते तौकीर निजामी (Tauqeer Nizami ) यांनी फर्मान सोडले आहे की रमजान महिना सुरू असून ईदची खरेदी ही मुस्लिमांच्या दुकानातूनच करा. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील मुस्लिमांना हेच सांगितले जात आहे. हिंदूंच्या कावड यात्रेवेळी हिंदूंच्याच दुकानांतून खरेदी करा असा दंडक घातला होता. त्यालाच हे प्रतिआव्हान आहे. गरीब मुस्लिमांना आर्थिक मदत व्हावी, हा या मागचा उद्देश आहे असे निजामी यांनी सांगितले असले तरी मुख्य संदेश हा मुस्लिमांच्याच दुकानातून खरेदी करा हाच आहे.
निजामी म्हणाले की, रमजान आणि ईददरम्यान जेवढी खरेदी कराल, ती गरीब मुस्लीम समाजातील लोकांकडून करा, जेणेकरून त्यांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्याकडे लक्ष देता येईल आणि जकातही गरजूंपर्यंत पोहोचेल. हे आवाहन नम्रतेने केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. केवळ एका समाजातच खरेदी करण्याचे आवाहन योग्य आहे का, असा सवाल विचारला जात आहे. देशातील मुसलमान या सल्ल्याचे कितपत पालन करतील, याबाबतही चर्चा सुरू आहे. 2025 मध्येही मुस्लिमांनी अशा प्रकारचे आवाहन केले होते.
यापूर्वी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर पोलिसांनी कावड यात्रेच्या मार्गावरील हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थांच्या वाहतूक करणार्या गाड्यांवर मालकांचे नाव ठळकपणे लिहिण्याचे आदेश दिले होते. यामागे दुकान हिंदूचे आहे की मुस्लीम मालक आहे हे कळावे हा होता. केवळ मालकच नाही तर त्या दुकानात काम करणार्या सर्व कामगारांच्या नावांची यादी फलकावर लिहा असेही सांगितले होते. त्यावेळी खळबळ माजली होती. योगी सरकारने सांगितले की, हा निर्णय भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये आणि त्यांना शुद्ध शाकाहारी अन्नाची खात्री मिळावी म्हणून घेतला आहे. मात्र विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर कडाडून टीका केली होती की हा आदेश मुस्लीम विक्रेत्यांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न आहे. जुलै 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश तात्पुरता स्थगित केला आणि स्पष्ट केले की दुकानदारांचे नाव जाहीर करण्याची सक्ती करता येणार नाही. मात्र तेव्हापासून धर्मभेदाचे राजकारण पेरले गेले.
———————————————————————————————————————————















