TCS Layoffs: ‘AI मुळे नाही तर…’. TCS च्या CEO ने सांगितले 12 हजार कर्मचारी कपातीचे नेमके कारण

TCS Layoffs

TCS Layoffs: देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातीलदिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के कर्मचाऱ्यांची (TCS Layoffs) कपात करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे सुमारे 12,000 नोकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे.

अनेकांना वाटले होते की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे कामे कमी झाल्याने ही कपात होत आहे, परंतु कंपनीने यामागे दुसरेच कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. टीसीएसच्या (TCS Layoffs) मते, कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांमध्ये आणि उपलब्ध कामांमध्ये तफावत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनीकंट्रोलशी बोलताना टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृतीवासन (K Krithivasan) यांनी सांगितले की, “नाही, ही कपात एआयमुळे उत्पादकतेत 20 टक्के वाढ झाल्यामुळे होत नाहीये. आम्ही असे काहीही करत नाही. कौशल्य जुळत नसलेल्या किंवा कर्मचाऱ्याला योग्य ठिकाणी कामावर लावता आले नाही अशा परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.”

ते पुढे म्हणाले, “आम्हाला कमी लोकांची गरज आहे असे नाही. आम्ही नेहमीच उच्च प्रतिभावान व्यक्तींना शोधत राहू, त्यांना कामावर घेऊ आणि त्यांना प्रशिक्षण देऊ. हे सर्व सुरूच राहील. हा निर्णय कर्मचाऱ्यांची नेमकी कुठे गरज आहे आणि त्यांना कामावर ठेवण्याची व्यवहार्यता कुठे आहे, यावर अधिक आधारित आहे.”

मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर परिणाम

या नोकरकपातीचा सर्वाधिक परिणाम मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. याशिवाय, जे नवशिक्या कर्मचारी बराच काळ ‘बेंच’वर होते, त्यांच्यावरही याचा परिणाम होईल.

कृतीवासन यांनी स्पष्ट केले होते, “आम्ही अनेक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. सुरुवातीच्या कौशल्यांमध्ये आम्ही सुमारे 5,50,000 लोकांना प्रशिक्षण दिले, तर प्रगत कौशल्यांमध्ये 1,00,000 लोकांना प्रशिक्षण दिले.

काही लोकांना प्रशिक्षण दिले गेले असले तरी, कदाचित त्यांना स्तर 1 आणि स्तर 2 पेक्षा पुढील कौशल्ये शिकवता आली नाहीत, कारण जेव्हा एखादा व्यक्ती खूप वरिष्ठ असतो तेव्हा त्याला सुरुवातीची कौशल्ये वापरता येत नाहीत.”

टीसीएस प्रभावित कर्मचाऱ्यांना नोटीस कालावधीचे वेतन आणि अतिरिक्त सेवामुक्ती पॅकेज देणार आहे. कंपनी विमा लाभांचा विस्तार करणार असून, प्रभावित कर्मचाऱ्यांसाठी ‘आउटप्लेसमेंट’ संधीही उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. ही नोकरकपात आर्थिक वर्ष 2026 च्या पुढील तीन तिमाहींमध्ये पूर्ण केली जाईल.