Thailand Cambodia Conflict: थायलंड आणि कंबोडियामध्ये (Thailand Cambodia Conflict) युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. मात्र, या दोन्ही देशांमधील संघर्षाचे कारण एक हिंदू मंदिर (Prasat Ta Muen Thom) ठरले आहे.
‘एमेरल्ड त्रिकोण’ (Emerald Triangle) या त्रिसीमावर्ती प्रदेशात दोन्ही देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. या भागात थायलंड, कंबोडिया आणि लाओस यांच्या सीमा एकत्र येतात. याच भागात असलेल्या प्राचीन मंदिरांवरून वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये ‘प्रसाद ता मुएन थोम’ मंदिर आणि ‘प्राह विहार’ मंदिर प्रमुख ठिकाणी आहेत.
प्रसाद ता मुएन थोम मंदिर का बनले वादाचे केंद्र?
प्रसाद ता मुएन थोम हे 12व्या शतकात बांधलेले खमेर स्थापत्यशास्त्राचे मंदिर आहे. थायलंडच्या सुरिन प्रांताच्या सीमेवर आणि कंबोडियाच्या ओडार मेन्चे प्रांतालगत हे मंदिर उभे आहे. शिवाला समर्पित असलेल्या या मंदिराच्या ठिकाणी नैसर्गिक खडकात कोरलेले शिवलिंगही आहे.
दोन्ही देश या मंदिरावर आपला हक्क सांगतात आणि सीमेचे स्पष्ट सीमांकन न झाल्याने वाद अधिकच गडद झाला आहे. येथे थायलंड आणि कंबोडियाच्या लष्करी तुकड्या सातत्याने गस्त घालत असल्याने अशा ठिकाणी चकमकी होण्याचा धोका कायम असतो.
कंबोडियाचे म्हणणे आहे की हे मंदिर ऐतिहासिक खमेर साम्राज्याचा भाग होता, तर थायलंडचा दावा आहे की मंदिर त्यांच्या सुरिन प्रांतात येते. फेब्रुवारीमध्ये कंबोडियन सैनिकांनी येथे राष्ट्रगीत गायल्याने थाई सैन्याने त्यांना विरोध केला होता. दोन्ही देशांत या मंदिरावरून 2011 मध्ये शेवटचा प्राणघातक संघर्ष झाला होता.
प्राह विहार मंदिरावरूनही तणाव कायम
कंबोडियामधील प्राह विहार मंदिर हे देखील शिवाला समर्पित असून, ते एक युनेस्को विश्व वारसा स्थळ आहे. हे मंदिर देखील वादाच्या केंद्रस्थानी आहे. कंबोडियाचा दावा आहे की थायलंडने त्यांच्या हद्दीत अतिक्रमण केले असून, 1907 च्या फ्रेंच वसाहतकालीन नकाशानुसार हे मंदिर कंबोडियामध्येच आहे.
या प्रकरणी कंबोडियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला (International Court of Justice) विनंती केली होती की, मंदिरावरील प्रादेशिक सार्वभौमत्व आपले आहे आणि थायलंडने 1954 पासून तेथे तैनात असलेली सशस्त्र तुकडी मागे घ्यावी. 1962 मध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने प्राह विहार मंदिर क्षेत्रावरील सार्वभौमत्व कंबोडियाला बहाल केले. या निर्णयानंतर दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधात मोठा तणाव निर्माण झाला. थायलंडने तेथे तैनात असलेली कोणतीही लष्करी किंवा पोलीस शक्ती मागे घ्यावी आणि 1954 पासून अवशेषांमधून काढलेल्या कोणत्याही वस्तू कंबोडियाला परत कराव्यात, असेही न्यायालयाने म्हटले होते.
मंदिरे ठरतात संघर्षाचे कारण
या संपूर्ण प्रकरणात स्पष्ट होते की धार्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली ही मंदिरे दोन्ही देशांसाठी सन्मानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे सीमारेषेवरील अनिश्चिततेमुळे संघर्ष वाढतच आहे. दोन्ही देशांनी शांततेसाठी संवाद साधावा, अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरून अपेक्षा व्यक्त होत आहे.