बँकॉक- थायलंडच्या पंतप्रधान पाइतोग्तार्न शिनावात्रा यांना तेथील न्यायालयाने पंतप्रधान पदावरुन निलंबित करण्यात आले आहे. कंबोडियाचे नेते हुन सेन यांच्याबरोबरच्या फोनवरील संवादादरम्यान त्यांनी थायलंडच्या सेनाप्रमुखांवर केलेल्या टीकेमुळे त्यांची ही उचलबांगडी करण्यात आली आहे.
पंतप्रधानांचा हा संवाद सार्वजनिक झाल्यानंतर त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. ३६ संसद सदस्यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत त्यांना पदावरुन दूर राहायला सांगितले आहे. या दरम्यान त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यात त्या दोषी आढळल्यास त्यांचे हे पद कायमस्वरुपी जाऊ शकणार आहे. पंतप्रधान शिनोवात्रा यांनी हा निर्णय मान्य केला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत थायलंडचे उपपंतप्रधान काळजीवाहू पंतप्रधानपद सांभाळतील, असेही थायलंडच्या न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यांनी थायलंड व कंबोडिया मधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने १५ जून रोजी कंबोडियाच्या नेत्यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी थायलंडच्या लष्करप्रमुखांच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर याबद्दल त्यांनी माफीही मागितली होती. शिनावात्रा यांचे सरकार गेल्या १० महिन्यांपासून सत्तेवर असून या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.